मराठी भाषा दिन कार्यक्रमावरुन मनसे आक्रमक; ठाकरे सरकारला इशारा

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – २७ फ्रेबुवारी रोजी महाराष्ट्रात कवीवर्य कुसुमाग्रज अर्थात विष्णु वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे एका स्वाक्षरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र या कार्यक्रमाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. आणि हा कार्यक्रम होणारचं अशी भूमिका मनसेने घेतली आहे. या कार्यक्रमाचे आयोजक अमेय खोपकर यांना पोलीसांनी नोटीस बजावली आहे.

पोलीसांनी नोटीस बजावल्यामुळे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. हिंमत असेल तर अमेय खोपकरांना अटक करुन दाखवाच असं विधान केले आहे. त्यामुळे मनसे विरुद्ध शिवसेना असा वाद पाहायला मिळत आहे. ज्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत, त्या संजय राठोडांना तुम्ही अटक करत नाही. त्यांच्या लाखो समर्थकांनी एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन केले. त्यावेळी करोनाचा प्रादुर्भाव वाढला नाही. त्यांच्या समर्थकांना अटक केली नाही. मग अमेय खोपकरांना नोटीस का पाठवली जात आहे. असा प्रश्न मनसेने पोलीसांना विचारला आहे.

यावर्षी खुद्द राज ठाकरे यांनी जाहीर पत्राद्वारे मराठी स्वाक्षरी मोहिमचे आवाहन केले आहे. मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन राज ठाकरे यांच्या सहीसह हे पत्र पोस्ट करण्यात आले आहे. दरम्यान शिवाजी पार्क येथे या कार्यक्रमासाठी परवानगी मागण्यात आली होती. मात्र ही परवानगी नाकारण्यात आली आहे.तरी आम्ही सर्व नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम करणार असल्याचे अमेय खोपकर यांनी सांगितले आहे.

सरकारने हवी ती कारवाई माझ्यावर करावी, मी तयार आहे. पण सरकारमधल्या एका मंत्र्याला वेगळा न्याय आणि नियम काटेकोरपणे पाळणाऱ्याला वेगळा न्याय, असं राज्यात सुरु आहे. राज्यातील आघाडी सरकार महाराष्ट्रात मराठी भाषा दिन पाळण्यास मज्जाव करत आहे. अशा सरकारचा आम्ही निषेध करतो. आणि हवी ती कारवाई करा पण मराठी भाषा दिन साजरा करणार म्हणजे करणार असा इशारा अमेय खोपकर यांनी सरकारला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here