मुंबई (प्रतिनिधी) – पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या वतीने चित्रा वाघ या महिला नेत्या सर्वाधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाल्या. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करत चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं. मात्र याच चित्रा वाघ यांच्याबाबत फोटो मार्फिंगद्वारे सोशल मीडियावर बदनामीकारक प्रकार घडला आहे.
चित्रा वाघ यांची ऑनलाईन बदनामी सुरू करण्यात आली आहे. चित्रा वाघ यांच्या पतीसोबतचा फोटो मॉर्फ करत त्याऐवजी संजय राठोड यांचा फोटो वापरुन तो पसरवला जात आहे. हा फोटो अनेक सोशल माध्यमांत व्हायरल केला गेला असून त्यामुळे चित्रा वाघ यांना नाहक त्रास होत आहे.
याच प्रकरणावरून चित्रा वाघ यांना याआधी शिवीगाळ करणारे, धमक्या देणारे फोन आले होते. त्यानंतर आता असे फोटो पसरवून त्यांची बदनामीही केली जाऊ लागली आहे. त्यामुळे असं कृत्य करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी समोर येत आहे.






