मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड व महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आघाडी उघणाऱ्या भाजपच्या महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ अडचणीत आल्या आहेत. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा नोंदवला आहे. बेहिशेबी संपत्ती जमवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
परळ येथील महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयाशी संबंधित एका प्रकरणात किशोर वाघ यांच्या विरोधात तक्रार आहे. त्या प्रकरणाचा तपास सुरू होता. तपासात किशोर वाघ यांच्या विरोधात काही माहिती मिळाल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडं असलेल्या ९० टक्के मालमत्तेचा हिशोब नाही, असं एसीबीचं म्हणणं आहे.
‘पूर्णपणे सूडबुद्धीनं माझ्या पतीच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. मला आणि माझ्या पतीला याबाबत कुठलीही कल्पना देण्यात आली नाही. बाजू मांडण्याची संधी न देता एकतर्फी कारवाई करण्यात आली आहे. कायदेशीर लढा देण्यासाठी मी तयार आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. ‘२०१६ ते २०२१ दरम्यान बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे. १ जानेवारी २०२१ ला चौकशी सुरू केली आणि लगेच गुन्हा दाखल झाला. मला या दाखल गुन्ह्याची माहिती पत्रकारांकडून समजली. एसीबीनं माझ्या नवऱ्याला व्हाट्सअॅपवरून नोटीस पाठवली,’ असं वाघ म्हणाल्या.
दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी राज्य सरकारला प्रश्न विचारणं चित्रा वाघ यांनी सुरूच ठेवलं आहे. नाशिक येथे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. ‘वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात पुरावे असताना सरकार का कारवाई करत नाही? अजूनही FIR का नाही? त्या मोबाईलमधील ऑडिओ क्लिपचं काय झालं? यात असलेला डेटा कुठे गेला? बलात्कारी आणि खुन्याला का वाचवताय?,’ असं प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.






