नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार तालुक्यातील आक्राळे गावालगत असलेल्या एका शेतात त्यांनी छापा टाकला असता, मक्याच्या शेतात आंतरपीक म्हणून शेतकऱ्याने घेतलेले पीक पाहून पोलिसही हैराण झालेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नंदुरबार तालुक्यातील आक्राळे गावालगत असणाऱ्या एका शेतात नंदुरबार जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून या ठिकाणी केली जाणारी अफूची शेती उद्ध्वस्त केली आहे. स्थानिक महसुल अधिकारी आणि पोलिसांनी पथक तयार करुन या शेतात घेतल्या जाणाऱ्या अफूची पिकं उपटून जमा केली आहे.
जवळपास दोन शेतात मक्यांच्या पिकामध्ये लपवून अफूची शेती केली जात होती. पोलिसांना या दोन शेतातून जवळपास ट्रॅक्टरभर अफूची बोंडं असलेली रोपं जप्त केली. रात्री उशीरापर्यंत नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन मध्ये दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील एकतर पोलीस पाटलांच्या वडिलांचे शेत असून या साऱ्या प्रकरणी पोलिसांनी ज्ञानेश्वर धनगर नामक संशयित आरोपीला अटक केली असून आणखीन एक आरोपी फरार आहे.
या सर्व कारवाईमध्ये अंदाजे 10 लाख किंमतीची पाचशे किलोंच्या जवळपास अफूच्या ३ गोण्या भरेल एवढी झाडं पोलिसांनी जप्त केली आहे. नंदुरबार तालुक्यात अशा पद्धतीने अफुची शेती केली जात होती. याबद्दल आता सर्वस्तरावरुन आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका पोलीस स्टेशनच्या या संयुक्त कारवाईबाबत कौतुक देखील होत आहे.






