प्रेमप्रकरणातून भररस्त्यात तरुणीला भोसकले

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – प्रेम प्रकरणातून प्रियकराने प्रेयसीवर चाकूने हल्ला केल्याची घटना शनिवारी सायंकाळी अंधेरी परिसरात घडली. चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या महिलेवर उपचार सुरू आहेत. हल्ल्याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी प्रियकराला अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पीडित तरुणी ही अंधेरीच्या साकीनाका परिसरात राहते. चार वर्षांपूर्वी तिची आरोपीसोबत ओळख झाली होती. ओळखीनंतर ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. आरोपी हा तरुणीला लग्नाबाबत विचारणा करत असायचा. शनिवारी सायंकाळी तरुणी ही कामावरून सुटून घरी जात होती तेव्हा आरोपीने तिचा पाठलाग केला. कृष्णानगर पाइपलाइनजवळील परिसरात आरोपीने तरुणीला थांबवले व त्याने तिचा जबरदस्तीने हात पकडला. त्यानंतर आरोपीने तरुणीच्या पोटात चाकू खुपसला. चाकूहल्ल्यात ती जखमी झाली. याची माहिती समजताच साकीनाका पोलीस घटनास्थळी गेले.

पोलिसांनी तिला उपचारासाठी शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. चाकू हल्लाप्रकरणी पोलिसांनी अटक आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here