मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – आपल्या कॉमिक टायमिंगनं रडणाऱ्या व्यक्तीलाही हसवू शकणारा अभिनेता सुनील ग्रोवर. सुनीलनं आपल्या हटके अंदाजानं आतापर्यंत अनेकांची मने जिंकली आहेत. सुनिल सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रीय असतो. नुकताच सुनीलनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांसाठी नवा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सुनील ज्यूस विकताना दिसत आहे.
सुनीलनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करत याला ‘अपनी डार्लिंग को ज्यूस पिलाओ’ असं कॅप्शन दिलं आहे. काही दिवसांपूर्वी सुनील रस्त्यावर छोले विकताना दिसला होता. त्याच्या या व्हिडीओलाही चाहत्यांची पसंती मिळाली होती. आता त्याचा नवा व्हिडीओही चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये सुनीलनं ज्यूसची किंमत 20 रुपये सांगितली आहे. सुनीलचा हा अवतार पाहून चाहते हैराण आहेत, तर मित्र त्याची चेष्टा करत आहेत.
सुनील ग्रोवर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या तांडव या वेबसीरिजमधून एका वेगळ्याच अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तांडवमधील त्याच्या कामाचं भरपूर कौतुक झालं आहे. कामाबद्दल बोलायचं झाल्यास, सुनील आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये झळकला आहे. त्यानं गब्बर इज बॅक आणि भारत यासारख्या सिनेमांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. दुसरीकडे कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वाद जगजाहीर आहे. मात्र, सुनील ग्रोवरनं द कपिल शर्मा शोमध्ये वापसी करावी अशी निर्माता सलमान खानचीही इच्छा आहे. अशात सगळं काही व्यवस्थित झाल्यास लवकरच चाहत्यांना कपिल आणि सुनीलला एकाच स्टेजवर पाहाता येईल, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.






