- भाजीपाला, किराणा, फळे,मासे,चिकन,मटण,अंडी दुकाने
- काही प्रमाणात काही तासांसाठी उघडण्यात परवानगी
- जिल्हाधिकार्यांकडून सुधारीत अधिसूचना जारी
- सकाळी 6 ते सकाळी 11 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी
अलिबाग – सोगावकर – रायगडात लॉकडाऊन कालावधीत जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात दूध विक्री दुकाने, किराणा सामान, फळे व
भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे यांचे दुकानदार व रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माणिक जगताप यांनी केलेल्या आग्रही मागणी मुळे आज जिल्हाधिकारी यांनी रविवार दिनांक 19-7-2020 पासून दुकाने सकाळी 6 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतची सुधारीत अधिसूचना आज (18 जुलै) जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात 15 जुलै रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 26 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला. तसे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले. संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करताना किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे यांची काऊंटर विक्रीला परवानगी देण्यात आली नव्हती. त्याऐवजी केवळ घरपोच सेवा सकाळी 8 ते रात्री 10 वाजेच्या दरम्यान पुरविण्यास परवानगी देण्यात आली होती. तसेच दूध विक्री व दुधाचे घरपोच वितरण करण्यास सकाळी 8 ते रात्री 10 वाजेदरम्यान परवानगी देण्यात आली होती.
काऊंटर विक्री बंद असल्याने, नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. काही दुकानदार, विक्रेते यांच्याकडून दुकाने सुरु करण्याची मागणी जोर धरत होती. अखेर याची दखल घेत, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज सुधारित अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात दूध विक्री दुकाने, किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे ही दुकाने, आस्थापना सकाळी 6 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.जनतेने याबद्दल जिल्हाधिकारी यांचे मनापासून आभार मानले आहेत.







