पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – विनामास्क रिक्षा चालकाला दंडाची पावती करण्यास सांगितल्याचा राग आल्यामुळे त्याने पोलिस हवालदाराच्या पोटात ठोसा मारल्याची घटना पुणे स्टेशन परिसरातील वाहनतळासमोरील रस्त्यावर घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, रिक्षाचालक अल्ताफ शेख (वय 17,रा. येरवडा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार तानाजी शिवाजी आडके यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हवालदार तानाजी आडके पुणे स्टेशन परिसरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत होते. त्यावेळी रिक्षाचालक शेख तोंडाला मास्क न लावता प्रवाशांची ने-आण करण्यासाठी ओरडत होता. त्यावेळी तानाजी यांनी त्याला मास्कची विचारणा केली. त्यानंतर तडजोड शुल्काची पावती करण्यास सांगितले.
मात्र आरोपी शेखने दंडात्मक पावती करण्यास नकार देत तानाजी आडके यांच्यासोबत वाद घातला. त्यांना पोटात ठोसा मारून धक्का देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक फड करीत आहेत.






