मुंबई (कार्यालय प्रतिनिधी)– मुंबई – गोवा महामार्गावर नवेगाव वडखळनजीक आज सोमवारी एस टी बस आणि मोटारसायकलच्या भीषण अपघातातात मोटारसायकलस्वार ठार तर एसटीतील १२ प्रवासी जखमी झाले.
सर्व जखमींना उपचारासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या अपघात प्रकरणी एसटी चालक विठ्ठल गरजे याला अटक करण्यात आली आहे.

मुंबई- गोवा महामार्गावरून एसटी बस (क्रमांक एम एच १४ बट २७४४) पाली येथून पेणकडे येत असताना पेण तालुक्यातील नवेगाव गावाजवळ आली असता वडखळकडून गडबकडे मोटारसायकल (क्रमांक एमएच ०६बीबी २६६७) कांचन लहू म्हात्रे हे चालवत असता एसटी बसने मोटारसायकलला समोरून धडक दिली.
मोटारसायकलस्वार कांचन लहू म्हात्रे (वय ४२, राहणार गडब ताल पेण) हे जागीच ठार झाले. तर एसीटी बस रस्त्याचे बाजूला कलंडल्याने बसमधील ११ प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

या अपघात प्रकरणी एस.टी. चालक विठ्ठल गरजे याला वडखळ पोलीसांनी ताब्यात घेतले असून वडखळ पोलिस निरिक्षक बाळा कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली वडखळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.






