सैन्यदलातील शिपाई भरतीचा पेपर फोडला, देशभरातील परीक्षा रद्द; पुणे येथे 7 जणांना अटक

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – सैन्य दलात शिपाई भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडून सैनिक भरती प्रशिक्षण केंद्रप्रमुखांना विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या 7 जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी 28 फेब्रुवारीला पुण्यातील केंद्रातील उमेदवारांना प्रश्नपत्रिका विकणार होते. त्यापूर्वीच पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली. याप्रकरणी वानवडी आणि विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. पेपर फुटल्याचे लक्षात आल्यानंतर संपूर्ण भारतात होणारी सैन्यदलाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे उपस्थित होते.

किशोर महादेव गिरी (वय – 40, रा. माळेगाव, बारामती) माधव शेषराव गित्ते (वय – 38, रा. सॅपर्सविहार कॉलनी, पुणे), गोपाळ युवराज कोळी (वय – 31, रा. दिघी) आणि आणि उदय दत्तू आवटी (वय – 23, रा. खडकी) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. यातील कोळी आणि आवटी हे सैन्य दलातील कर्मचारी आहेत. त्याशिवाय विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अली अख्तरखान (वय – 47), आझाद लालमोहम्मद खान (वय – 37) आणि महिंद्र चंद्रभान सोनवणे (वय – 37) यांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यासह भारतातील 40 परीक्षा केंद्रावर सैन्यदलाच्या रिलेशन आर्मी शिपाई भरतीची परीक्षा 28 फेब्रुवारीला होणार होती. संबंधित परीक्षेला देशभरातून 30 हजार विद्यार्थी बसले होते. परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडून काहीजण प्रश्नपत्रिका सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र प्रमुखांना भरपूर किमतीने विकणार असल्याची माहिती सदर्न कमांड मिलीटरी इंटेलिजन्सच्या लायझनला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी याची माहिती पुणे पोलिसांना दिली होती. त्यानंतर पुणे पोलिसांच्या दोन वेगवेगळ्या पथकाने वानवडी आणि विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सापळा रचून कारवाई करून सातजणांना अटक केले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, सहायक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, प्रवीण राजपूत, मधुकर तुपसौंदर, नितीन कांबळे, अश्विनी केकाण, राजेंद्र लांडगे, गजानन सोनवलकर, अतुल साठे, प्रफुल्ल चव्हाण, हनुमंत कांदे, पिराजी बेले यांच्या पथकाने केली.

परीक्षेआधीच पेपर देण्यासाठी विद्यार्थ्यांना एकत्र केले
आरोपी माधव गित्ते याने सैन्यदलाच्या रिलेशन आर्मी शिपाई भरतीची फोडलेली प्रश्नपत्रिका परीक्षेच्या आदल्या रात्री परीक्षार्थ्यांना देण्यासाठी 14 जणांना विश्रांतवाडीतील एका हॉटेलमध्ये एकत्र केले होते. त्यापूर्वीच पुणे पोलिसांनी रॅकेट उदध्वस्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here