बंगळूरू – एका 27 वर्षांच्या पुरुषाला कर्नाटकमध्ये अपघातात ब्रेन डेड झाल्याचं जाहीर करण्यात आलं. मात्र त्याच्याच दुसऱ्या दिवशी मंगळवारी त्याचे महत्त्वाचे अवयव सुरळीत काम करत असून उपचारास प्रतिसाद देत असल्याचं समोर आलं. त्या माणसाचा देह दूसऱ्या हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला गेला. त्यावेळी शवविच्छेदनासाठी नेमलेल्या डॉक्टरनं त्याच्या देहाला स्पर्श केला आणि एकाएकी त्यांना हाताची हालचाल जाणवली. या डॉक्टरांच्या अंगांवर हे पाहून अक्षरश: शहारे आले.
शंकर गोम्बी यांचा 27 फेब्रुवारीला महालिंगपूर इथं अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. दोन दिवसांनी हॉस्पिटलनं गोम्बी यांच्या कुटुंबाला त्यांचा देह घेऊन जाण्यास सांगितलं. गोम्बी यांचा कथित मृतदेह महालिंगपूर इथल्या सरकारी दवाखान्यात सोमवारी पाठवण्यात आला. इथं या देहाचं शवविच्छेदन केलं जाणार होतं. त्याच दिवशी गोम्बी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारीही त्यांचं कुटुंब करत होतं.
एस. एस. गलगली या डॉक्टरांकडे शवविच्छेदनाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. गलगली म्हणाले, या कुटुंबाला कळवण्यात आलं होतं, की व्हेंटिलेटर काढल्यावर तो अधिकृतपणे मृत झालेला असेल. त्यामुळं त्यांनीही अंतिमसंस्काराची तयारी सुरू केली होती. गोम्बीच्या मित्रांनी सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची बातमी जाहीर केली होती. त्यामुळं मी हॉस्पिटलला पोचेपर्यंत तिथं जवळपास 1000 लोक जमलेले होते. मी आत जाऊन शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी देहाला स्पर्श केला तोच मला दिसलं, की गोम्बीच्या अंगावर शहारे आले आहेत… याचाच अर्थ शरीरात संवेदना अजून जिवंत होत्या. मी लगेचच प्लस ऑक्सिमीटर वापरत नाडी तपासली, हृदयाचे ठोकेही तपासले. नाडी लागत होती. मग मी व्हेंटिलेटर काढून टाकलं आणि जरावेळ वाट पाहिली. आणि काय आश्चर्य, त्याच्या हाताची हालचाल झाली! मी लगेचच कुटुंबाला बोलावलं आणि त्याला दुसऱ्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.’
बगलकोटाच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितलं, की आमच्याकडे अद्याप तक्रार आलेली नसल्यानं कुठलीच केस नोंदवण्यात आलेली नाही. ‘वैद्यकीय बेजबादारापणाची केस नोंदवण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाला पुढाकार घ्यावा लागेल.’ गोम्बी जिथं उपचार घेत होते त्या खासगी हॉस्पिटलचे अधिकारी बाजू सांगण्यासाठी उपलब्ध होऊ शकले नाही. हॉस्पिटलची बाजू कळाल्यावर बातमीत ती नोंदवली जाईल.






