दोंडाईचा (संतोष कोळी) – येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूल या सीबीएसई शाळेचा इ.10 वी(AISSE) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार शाळेचे अध्यक्ष श्री.हिमांशू शाह,डॉ.रवींद्रनाथ टोणगांवकर,डॉ.आशाताई टोणगांवकर व प्राचार्य एम.पी. पवार यांच्या हस्ते करण्यात आला.या सत्कार समारंभाला गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांनाही आमंत्रित करण्यात आले होते.
या शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या परीक्षेत कु.तानिया वालेचा व कु.सलोनी पुरसवानी या दोघी 97:60% गुण मिळवून प्रथम आल्या.कु.दिव्या इंदाणी ही 97:40% गुण मिळवून द्वितीय तर कु. तन्वी शाह ही 96:60%गुण मिळवून तृतीय आली. यासह कु.संजना पुरसवानी, तुषार बदलानी, सम्यक जैन,कु.यशस्वी कुवर कु.प्रियंका ठाकरे,प्रथम पुरसवानी, हर्ष जैन, मंगेश पवार अशा एकूण 12 विद्यार्थ्यांनी 90%पेक्षा जास्त गुण मिळवून शाळेची व स्वतः ची गुणवत्ता सिद्ध करून दाखवली.
या गुणवंत विद्यार्थ्यांना स्व.प्राचार्य गोविंद दामोदर रानडे व स्व.शकुंतलाबाई गोविंद रानडे यांच्या स्मरणार्थ डॉ.रवींद्रनाथ टोणगांवकर व आशाताई टोणगांवकर यांच्या हस्ते रोख बक्षीस देण्यात आले.
रोटरी स्कूलने धुळे जिल्ह्यात द्वितीय व तृतीय क्रमांक तर दोंडाईचा,शहादा,शिरपूर नंदुरबार परिसरात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
डॉ. रवींद्रनाथ टोणगांवकर यांनी स्वामी विवेकानंदांनी आपण मानवी जीवनात काहीतरी ठोस प्रयत्न करून कायमस्वरूपी अस्तित्व निर्माण करावे ,नाहीतर झाडे, दगडही अस्तित्वात येतात व ऱ्हास पावतात असे सांगितले आहे. जिद्द व चिकाटी यांच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येतात असे मार्गदर्शन केले. तर शाळेचे अध्यक्ष श्री.हिमांशू शाह यांनी यावर्षी देशपातळीवर एकूण 90% व त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षापेक्षा 25 टक्क्यांनी कमी आहे;म्हणून शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हा कौतुकाचा विषय आहे.शाळेच्या 100% उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवून विद्यार्थ्यांनी यशाचा कळस गाठल्याचे सांगितले व प्राचार्य श्री एम.पी. पवार यांनी विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची शिकस्त करून विकास साधला असल्याचे मत प्रतिपादन केले.
गुणवंत विद्यार्थ्यांनी आमच्या या यशात,मैनेजमेंट,प्राचार्य, शिक्षक, पालक यांचा मोलाचा वाटा असल्याचे मत व्यक्त केले.







