एकेकाळी चरितार्थासाठी पानटपरी चालविणारा अभिनेता आज ठरलाय प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत…

योगेश शुक्ल, जळगाव

मराठी कलाविश्वात अनेक नावाजलेले विनोदवीर आहेत. मात्र काही विनोदवीर असे आहेत, ज्यांनी थेट प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता, विनोदवीर भाऊ कदम. आपल्या विनोदबुद्धीने आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत भाऊ कदमने अनेकांची मनं जिंकली. #भाऊ_कदम @MiBhauKadam, #Bhau_Kadam या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याचं खरं नाव भालचंद्र कदम असं आहे. मात्र चाहते त्याला प्रेमाने भाऊ कदम असंच म्हणतात. आज ३ मार्च भाऊ कदम यांचा वाढदिवस. १९९१ मध्ये त्यांनी नाटकात काम केले व येथून त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात झाली.
फू बाई फू आणि चला हवा येवू द्या यामधील भूमिकांबद्दल ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी ९ पेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केले आहे आणि ५०० हून अधिक नाटक प्रयोगांमध्ये काम केले आहे. अगदी हलाखीच्या परिस्थितीतून वर आलेले भाऊ कदम जन्म एका कोकणी कुटुंबात झाला. त्यांचे वडील बीपीटीत नोकरीला होते तर आई गृहिणी. बालपणापासूनच त्यांना त्यांच्या घरचे सर्व भाऊ म्हणून हाक मारतात. वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.
बालपणापासूनच ते लाजाळू आणि शांत स्वभावाचे आहेत. वडाळ्याच्या बीपीटी कॉलनीत भाऊ कदम यांचा जन्म झाला. पुढील शिक्षणही तेथेच झाले आणि मुंबईने त्यांना जीवनाचे अनुभव दिले. वडिलांची नोकरी बिपीटीत असल्याने त्यांच्याच क्वार्टर्समध्ये बालपण गेले. त्यामुळे वीज, पाणी हा सगळा खर्च कंपनीतर्फे केला जाई. अर्थात तोपर्यंत घराची सगळीच जबाबदारी वडिलांच्या खांद्यावर असल्याने निर्धास्तपणे जगत होते. पण वडिलांच्या निधनानंतर अचानक परिस्थिती बदलली. वडिलांच्या निधनानंतर ते डोंबिवलीत शिफ्ट झाले. यानंतर त्यांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.सुरुवातीला घर खर्चासाठी मतदार नावे नोंदणीचे काम देखील भाऊ कदम यांना करावे लागले. जगण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याने भावाच्या साथीने पानाची टपरी सुरू केली होती. दरम्यान, एवढा मोठा संघर्ष सुरु असताना याकाळात देखील त्यांनी स्वतःमधील अभिनेता जिवंत ठेवला. करिअरमध्ये मोठी संधी मिळत नसल्याचे पाहून त्यांनी अभिनयाला रामराम ठोकण्याचाही विचार केला होता.
त्यांचे गुरु विजय निकम यांच्या सांगण्यावरुन त्यांच्या आईंनी त्यांना अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याची परवानगी दिली. अनेक नाटकांमध्ये त्यांनी छोट्या भूमिका साकारल्या आहेत. अनेक एकांकिकांमध्ये भाग घेतला. कॉलेज जीवनात असताना त्यांनी आपल्या काही मित्रांसोबत मिळून ‘कोब्रा 37’ या नावाने आपला एक ग्रुप तयार केला. या ग्रुपमध्ये कमलाकर सातपुते आणि किशोर चौगुले हे प्रसिद्ध अभिनेतेही त्यांच्यासोबत सहभागी होते. विजय निकम यांच्या ‘एवढाच ना’ या नाटकाद्वारे त्यांना पहिला कमर्शिअल ब्रेक मिळाला. या नाटकात त्यांनी शॉर्ट टर्म मेमरी लॉस असलेल्या व्यक्तीची भूमिका वठवली होती. विजय निकम यांनी त्यांना ‘जाऊ तिथे खाऊ’ या नाटकात मुख्य भूमिका दिली. हे नाटक त्यांच्या करिअर साठी मैलाचा दगड ठरला.
पंधरा वर्षांत भाऊ यांनी जवळजवळ ५०० हून अधिक नाटकांमध्ये अभिनय केला आहे. ‘एक डाव भूताचा’, ‘बाजीराव मस्त’ मी या नाटकांमधील त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. त्यांचे ‘रानभूल’ हे नाटक रंगभूमीवर गाजले होते. भाऊ नाटकांमध्ये काम करत असल्याने त्यांच्याबद्दल इंडस्ट्रीतील ब-याच लोकांना माहित होते. त्यांच्यापैकी काहींनी त्यांचे नाव ‘फू बाई फू’साठी सुचवले. मात्र सलग दोनदा भाऊंनी ‘फू बाई फू’ची ऑफर नाकारली. लाजाळू स्वभावाच्या भाऊंना मला हे काम जमणार नाही, असे वाटायचे. मात्र तिस-यांदा आलेली ऑफर त्यांनी स्वीकारली आणि संधीचे सोने केले. पुढे भाऊ ‘फू बाई फू’च्या सहाव्या पर्वाचे ते विजेतेसुद्धा ठरले.
चला हवा येवू द्या या मालिकेत त्यांनी पप्पू, ज्योतिषी आणि अनेक विविध वर्णनांचे चरित्रभूमिका केल्या. अभिनयातील जवळजवळ प्रत्येक भूमिकेत आपला एक वेगळा ठसा उमटवला. आज #भाऊ_कदम #Bhau_Kadam हे महाराष्ट्रातील घराघरात पोहचले असून मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत बनले आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या शोचे ४०० हून अधिक प्रयोग झाले आहेत.
भाऊ यांनी ममता यांच्या बरोबर प्रेमविवाह केला आहे. भाऊ कदम यांना ३ मुली असून मृण्मयी, संचिती आणि समृद्धी अशी नावे आहेत. भालचंद्र कदमांनी अनेक चित्रपटांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. हरीशचंद्राची फॅक्टरी, सांगतोय काय, आम्ही बोलतो मराठी, एक कटिंग चाय, पुणे वाया बिहार, चांदी, कुटुंब, फक्त लढ म्हणा, मस्त चाललंय आमचं, नारबाची वाडी, कोकणस्थ, टाईम पास, टाईम पास 2, बाळकडू आणि जाऊ द्या ना बाळासाहेब इतर मराठी चित्रपट तसेच हिंदी चित्रपट म्हणजे फेरारी की सवारी या यामधून ही भाऊ आपल्याला दिसला. मराठी मध्ये होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमांत भाऊ असायलाच पाहिजे तर कॉमेडी पूर्णत्वाला गेल्यासारखी वाटतें आणि म्हणून होणाऱ्या प्रत्येक अवार्ड शो मध्ये भाऊचे टायमिंग साधून आलेले विनोद ऐकुन प्रेक्षक ही पोट धरून हसताना आपल्याला दिसतात. भाऊ कदम यांचे वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक अभीष्टचिंतन!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here