जळगावच्या शरद भालेरावांचा ‘इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये विश्वविक्रम

विश्वविक्रम

‘मी सावली भिमाची’ एकपात्री नाट्यप्रयोगाचे सलग २५ तास सादरीकरण

जळगाव (संपादक सुनिल पाटील) | भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जळगावचे प्रसिद्ध कलाकार तथा जळगाव जनता बँकेचे कर्मचारी शरद भालेराव यांनी एक आगळावेगळा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा ज्वलंत इतिहास मांडणारा ‘मी सावली भिमाची’ हा एकपात्री नाट्यप्रयोग त्यांनी सलग २५ तास सादर करून ‘इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे. या विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र, मेडल आणि सन्मानचिन्ह नुकतेच शरद भालेराव यांना प्राप्त झाले असून, त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जळगाव शहरासह विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

जळगाव येथील आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, जळगाव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने या विक्रमी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नूतन मराठा महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये २५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता ‘मी सावली भिमाची’ या एकपात्री नाट्यप्रयोगाला सुरुवात झाली.
प्रत्येकी सुमारे १ तास २० मिनिटांचा प्रयोग अशा पद्धतीने शरद भालेराव यांनी सलग २२ प्रयोग सादर केले. दुसऱ्या दिवशी, म्हणजे २६ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता या विक्रमी प्रयोगाची सांगता झाली. अशा प्रकारे त्यांनी सलग २५ तास रंगमंचावर अभिनय करून हा आगळावेगळा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
शरद भालेराव यांच्या नावावर यापूर्वीही एक मोठा विश्वविक्रम नोंदविला गेला आहे. त्यांनी रांगोळीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तब्बल १७ हजार चौरस फुटांचे भव्य पोर्ट्रेट साकारले होते. त्यांच्या या कलाकृतीची नोंद **‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली होती.
आता ‘मी सावली भिमाची’ या एकपात्री नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून सलग २५ तास अभिनयाचे विक्रमात्मक सादरीकरण करून त्यांनी आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
शरद भालेराव यांच्या या ऐतिहासिक कामगिरीचे जळगाव शहर व परिसरात उत्साहात स्वागत होत आहे. जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी भालेराव यांच्या विश्वविक्रमाचे विशेष कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील कलाप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
हा विश्वविक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर सूर्यवंशी, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्रा. एल. पी. देशमुख, दिग्दर्शक चिंतामण पाटील, प्रबुद्ध भालेराव, विलास यशवंते, हरिश्चंद्र सोनवणे, विठ्ठल भालेराव, कुलदीप भालेराव, वैभव सोनवणे आणि संजय सूर्यवंशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here