जळगाव (संपादक सुनिल पाटील) : गजानन चॅरिटेबल संस्थेच्या वतीने नुकताच ८ ऑगस्ट २०२६ रोजी “उडान २०२६ – फ्युचर कनेक्ट आणि फ्रेशर्स सेलिब्रेशन” हा अत्यंत आकर्षक व प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासोबतच त्यांना भविष्यातील करिअरसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे, ठाण्यातील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय (स्वायत्त) चे प्राचार्य डॉ. गणेश रामदास भगुरे आणि संस्थेचे सचिव डॉ. व्ही. टी. पाटील उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना करिअरचे नियोजन, उच्च शिक्षणातील संधी, कौशल्य विकास आणि भविष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तयारीवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांसाठी हे मार्गदर्शन सत्र अत्यंत उपयुक्त ठरले.
कार्यक्रमात एचएससी (HSC) परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केलेले गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा आकर्षक ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. तसेच, शैक्षणिक वर्षासाठी नव्याने निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी परिषदेची घोषणा करण्यात आली आणि पदाधिकाऱ्यांना मानचिन्ह व बॅज प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने ‘सरस्वती वंदनेने’ झाली. त्यानंतर उच्च शिक्षण आणि विविध करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शनपर सत्र पार पडले. कनिष्ठ महाविद्यालय व पदवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘फ्रेशर्स सेलिब्रेशन’ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण वातावरणात एकच उत्साह निर्माण केला. विद्यार्थ्यांसाठी हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेचे सर्व प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे व विशेष योगदान लाभले.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव “उडान २०२६ – फ्युचर कनेक्ट आणि फ्रेशर्स सेलिब्रेशन” उत्साहात संपन्न; गजानन चॅरिटेबल...







