सोलापूर: पत्रकारांच्या घरकुलासाठी ‘पत्रकार सुरक्षा समिती’ आक्रमक; ९ ऑगस्ट क्रांती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

पत्रकार

पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) : पत्रकारिता हा एक वसा आणि चळवळ समजून समाजातील वंचित घटकांसाठी, तसेच अन्यायग्रस्त व अत्याचारग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक पत्रकारांकडे आजही राहण्यासाठी स्वतःचे पक्के घर नाही. अल्प मानधन आणि तुटपुंज्या जाहिरातींवर दिवस काढणाऱ्या बहुसंख्य पत्रकारांना आर्थिक परिस्थितीमुळे स्वतःची हक्काची घरे घेता आलेली नाहीत. हाच ज्वलंत प्रश्न हाती घेत ‘पत्रकार सुरक्षा समिती’च्या वतीने ९ ऑगस्ट क्रांती दिनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

कोरोनासारख्या जीवघेण्या काळातही पत्रकारांनी स्वतःचा व कुटुंबाचा जीव धोक्यात घालून शासनाचे आदेश आणि बातम्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचे राष्ट्रीय व सामाजिक कर्तव्य पार पाडले. मात्र, अद्यापही हक्काच्या घरापासून वंचित असलेल्या पत्रकारांना ‘प्रधानमंत्री आवास योजनेतून’ घरकुल मिळावे, या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीने १८ जून २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. तसेच १२ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे येथे विभागीय आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले होते.पत्रकार
विभागीय आयुक्तांनी या निवेदनाची दखल घेऊन पुढील कार्यवाहीसाठी संचालक, ग्रामीण गृहनिर्माण (महाराष्ट्र राज्य) यांना पत्रही पाठवले होते. परंतु, ग्रामीण गृहनिर्माण विभागाने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने, राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी क्रांती दिनी हे आक्रमक धरणे आंदोलन करावे लागले.
आंदोलनादरम्यान, “कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही”, “आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा”, “मुख्यमंत्री होश मे आओ”, “पालकमंत्री होश मे आओ” अशा विविध घोषणा देत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद परिसर दणाणून सोडण्यात आला.
पत्रकारांच्या या हक्काच्या घरकुल लढ्याला ‘पत्रकार कृती समिती’च्या वतीने सैफन शेख व युनूस आत्तार यांनी लेखी पत्र देऊन पाठिंबा दर्शवला. तसेच दैनिक सोलापूर भूषणचे ज्येष्ठ संपादक विष्णू कारमपूरी आणि दैनिक अबतकचे संपादक प्रसाद जगताप यांनीही या आंदोलनात सहभागी होत पाठिंबा जाहीर केला.
या आंदोलनात पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख, जिल्हाध्यक्ष राम हुंडारे, जिल्हा संघटक अरुण सिडगिद्दी, जिल्हा सचिव अंबादास गज्जम, शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी, कार्याध्यक्ष राजू वग्गू, समन्वयक लक्ष्मण सुरवसे, सचिव गणेश निंबाळकर, प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी, श्रीनिवास पेद्दी, संदीप धोत्रे, विष्णू सकट, साजिद मकानदार, ‘साप्ताहिक यश संघर्ष’चे संपादक सादिक शेख, अकबर शेख, वैजिनाथ बिराजदार यांच्यासह अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here