मंगळवेढ्याला ‘म्हैसाळ’मधून ५ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सर्व्हेचे आदेश

म्हैसाळ

पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) | म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील मंगळवेढा तालुक्यातील १९ गावांना ५ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आता प्रत्यक्ष लाभक्षेत्राचा सर्व्हे केला जाणार आहे. जलसंपदामंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत जलसंपदा विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी यासंदर्भात प्रशासनाला तातडीने सर्व्हे करण्याचे आदेश दिले. आमदार समाधान आवताडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातील शेतीसाठी हक्काचे पाणी मिळण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

म्हैसाळ योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील १९ गावांसाठी सध्या १.२७ टीएमसी पाणी मंजूर आहे. मात्र, मंगळवेढा तालुका या योजनेच्या शेवटच्या टोकाला (टेल एंड) असल्याने मंजूर पाण्याच्या १० टक्के पाणीही नियमित व पुरेशा दाबाने मिळत नाही. परिणामी, शेतीचे मोठे नुकसान होत असून दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. हा गंभीर प्रश्न आमदार आवताडे यांनी बैठकीत मांडत, या भागातील वाढत्या सिंचन क्षेत्रासाठी किमान ५ टीएमसी पाण्याची आवश्यकता असल्याचे आकडेवारीसह स्पष्ट केले.

“मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे आणि पुरेसे पाणी मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर सुरू असलेला पाठपुरावा असाच अविरत चालू राहील.”
— समाधान आवताडे, आमदार, मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघ

आमदार आवताडे यांनी मांडलेली वस्तुस्थिती लक्षात घेऊन जलसंपदा सचिव एकनाथ डवले यांनी मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातील प्रत्यक्ष लाभक्षेत्र, शेतीचे क्षेत्रफळ आणि पाण्याची निकड याचा सविस्तर सर्व्हे करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. या सर्व्हेनंतर ५ टीएमसी पाणी देण्याबाबतची पुढील प्रशासकीय प्रक्रिया तातडीने राबवली जाईल.
बैठकीत म्हैसाळ योजनेच्या वितरिका क्र. १ व २ वरील गावांना गळतीशिवाय व पूर्ण दाबाने पाणी मिळण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनला मंजुरी द्यावी, माण व भीमा नदीवरील बंधाऱ्यांची उंची वाढवण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी., मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती देण्यासाठी नाबार्डकडून आवश्यक वित्तपुरवठ्याला मंजुरी द्यावी. आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here