स्वातंत्र्यदिनीही फिल्मसिटीत शूटिंग सुरू; कामगारांच्या हक्कासाठी सिनेसृष्टी असोसिएशनचे आंदोलन

फिल्मसिटी

गोरेगाव (मुंबई) (जेष्ठ पत्रकार सुरेश पटनाईक) | देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत (फिल्म सिटी) मात्र ज्युनियर आर्टिस्ट आणि कामगारांच्या हक्कांवर गदा आल्याचा प्रकार समोर आला आहे. शासकीय सुट्टी असतानाही काही स्टुडिओमध्ये हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण सुरू ठेवल्याच्या निषेधार्थ सिनेसृष्टी असोसिएशनने आक्रमक होत गोरेगाव पोलीस ठाण्यावर शांततामय मोर्चा काढला.

सिनेसृष्टी असोसिएशनचे अध्यक्ष बुवा काका सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकारी, महिला व पुरुष कलाकार तसेच ज्युनियर आर्टिस्ट यांनी १५ ऑगस्ट रोजी संविधानाच्या मूल्यांचा आदर राखत ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन साजरा केला. मात्र, याच दरम्यान फिल्मसिटीतील काही स्टुडिओमध्ये हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण सुरू असल्याचे संघटनेच्या निदर्शनास आले.
कामगार विभागाच्या नियमांनुसार आणि शासकीय घोषणेनुसार १५ ऑगस्ट हा राष्ट्रीय सण असल्याने सर्व कामगारांना हक्काची सार्वजनिक सुट्टी मिळणे बंधनकारक आहे. मात्र, निर्मात्यांनी ज्युनियर आर्टिस्ट व कामगारांना कामावर बोलावल्यामुळे त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात सहभागी होता आले नाही, असा थेट आरोप संघटनेने केला आहे.
या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष बुवा काका सकपाळ यांनी फिल्मसिटी प्रशासनाला आधीच लेखी निवेदन देऊन स्वातंत्र्यदिनी चित्रीकरण बंद ठेवण्याची मागणी केली होती. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कामगारांनी एकत्र येत फिल्मसिटीतून गोरेगाव पोलीस ठाण्याकडे मोर्चा वळवला आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here