सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना १५ कोअर ओपी सिग्नल रेजिमेंटचे जवान वैभव तात्यासो आवताडे (वय २५) यांना गुरुवारी (१४ ऑगस्ट २०२६) वीरमरण आले. अत्यंत कमी वयात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या मंगळवेढ्याच्या या वीरपुत्राच्या निधनाची वार्ता समजताच गणेशवाडी गावासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर तीव्र शोककळा पसरली आहे.
शहीद वैभव आवताडे हे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथील मूळ रहिवासी होते. लहानपणापासूनच देशसेवेची तीव्र आवड असल्यामुळे त्यांनी कमी वयात भारतीय सैन्यदलात प्रवेश केला होता. ते ‘१५ कोअर ओपी सिग्नल रेजिमेंट’मध्ये कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.
शहीद वैभव आवताडे यांचे पार्थिव मूळ गावी गणेशवाडी येथे आणले जाणार असून, तेथे लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. अंत्यसंस्कारापूर्वी मंगळवेढ्यातील ऐतिहासिक दामाजी चौकातून त्यांच्या पार्थिवाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
मंगळवेढाकर, ग्रामस्थ, माजी सैनिक संघटना तसेच स्थानिक अकॅडमीच्या मुलांनी हातात तिरंगा फडकावून शहीद वैभव आवताडे यांना अश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. अवघ्या २५ व्या वर्षी देशासाठी बलिदान देणाऱ्या या वीरपुत्राच्या स्मृतीस संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून आदरांजली वाहिली जात आहे.







