पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) | अनुसूचित जाती (एससी) आरक्षणाचे उपवर्गीकरण राज्यात तात्काळ लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी येत्या २९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर सकल मातंग समाजाच्या वतीने ‘राज्यस्तरीय निर्धार महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मातंग समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल मस्के यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निकालानुसार एससी आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारांना बहाल केला आहे. या निर्णयाची दखल घेत पंजाब, हरियाणा, तेलंगणा व कर्नाटक या राज्यांनी प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली असली तरी महाराष्ट्र शासनाने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. गेल्या चार दशकांपासून या मागणीसाठी संघर्ष सुरू असून मागील दोन महिन्यांत राज्यभरात ७२ हून अधिक मोर्चे काढूनही शासनाने पुरेशी दखल घेतलेली नाही, अशी खंत मस्के यांनी व्यक्त केली.
येत्या २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आझाद मैदान, मुंबई येथे हा महामोर्चा पार पडणार असून, जिल्ह्यातील सर्व उपेक्षित व वंचित घटकांतील बांधवांनी हक्काच्या लढ्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईत उपस्थित राहावे, असे आवाहन लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.







