जळगाव शहर विधानसभा जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार लढवणार; मुंबईत वरिष्ठ नेत्यांकडे मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर शरद चव्हाण) | २०२९ मध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लढवली जावी, अशी आग्रही मागणी जळगाव महानगर पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मुंबई येथील पक्ष प्रदेश कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.

आज १६ ऑगस्ट २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव जिल्हा आणि महानगर क्षेत्राचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, प्रदेश सरचिटणीस आमदार रोहित पवार, उत्तर महाराष्ट्र प्रभारी माजी आमदार सुनील भुसारा, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, जळगाव जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे आणि युवक प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर उपस्थित होते.
बैठकीत २०१४ ते २०२४ या कालावधीत जळगाव शहर मतदारसंघात झालेल्या विविध निवडणुका आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जळगाव शहराची वाढती व्याप्ती आणि पक्षाची वाढती ताकद पाहता, २०२९ ची विधानसभा निवडणूक स्वबळावर किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून पक्षाने लढवावी, असा प्रस्ताव पदाधिकाऱ्यांनी मांडला. हा प्रस्ताव गांभीर्याने घेत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आगामी काळासाठी संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे व निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले.
या बैठकीस जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रमोदबापू पाटील, धुळे जिल्हा निरीक्षक दिलीप खोडपे, जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. कल्पिताताई पाटील, कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, महानगर युवक अध्यक्ष विनायक पाटील आणि ओबीसी सेलचे महानगर अध्यक्ष गिरीश सांगळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here