जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – मी कंटाळलीय, जीवाचे बरे वाईट करुन घेते म्हणून नातेवाई असलेल्या शोभा चौधरी यांना विमलबाई काशिनाथ चौधरी वय 55 रा. रामेश्वर कॉलनी या विवाहितेने फोन केला. आत्महत्या करण्यासाठी असोदा रेल्वे गेट गाठले. शोभा चौधरी यांनी पोलिसांना प्रकार कळविला. पोलिसांनी विमलबाई यांना फोनवर बोलण्यात ठेवा, असे चौधरी यांना सांगून घटनास्थळी पोहचण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत विमलबाई यांनी रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली होती. बुधवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास ही घडली. दरम्यान विवाहितेच्या आत्महत्येचे कारण कळू शकलले नाही.
विमलबाई चौधरी रा. रामेश्वर कॉलनी ह्या पती काशिनाथ ओंकार चौधरी आणि मुलगा सचिन चौधरी यांच्यासोबत रामेश्वर कॉलनी येथे वास्तव्यास होत्या. बाजार समितीत भाजीपाला खरेदी करुन त्याच ठिकाणी भाजीला विक्री करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. बुधवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास विमलबाई नेहमीप्रमाणे भाजीपाला विक्रीसाठी पती व मुलगा सचिन यांच्यासोबत बाजार समितीत आल्या.
दुपारी 11 वाजता विमलबाई भाजीलाला विक्री करत होत्या. यानंतर दुपारी 12 वाजता पती तसेच मुलगा या दोघांपैकी कुणालाच काही एक न सांगता, विमलबाई रिक्षाने असोदा रेल्वे गेटजवळ पोहचल्या. याठिकाणाहून त्यांनी जवळ असलेल्या मोबाईलवरुन जेठाणी तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी शोभा चौधरी यांना फोन केला. मी कंटाळली असून जीवाचे बरेवाईट करुन घेते असे सांगून फोन कट झाला. शोभा चौधरी यांनी ही माहिती शनिपेठ पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांना दिली.
ससे यांनी चौधरी यांना विमलबाई यांना फोनवर बोलण्यात व्यस्त ठेवा, आम्ही घटनास्थळी पोहचत असल्याचे सांगितले. यानंतर चौधरींनी पुन्हा फोन केला, फोनवर बोलण्यात व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस पोहचण्यापूर्वीच फोन कट होवून विमलबाई यांनी रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. यानंतर पोलिसांनी त्यांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळाल्यावर विमलबाई यांचे पतीसह मुलगा जिल्हा रुग्णालयात पोहचले. व मन हेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ विलास शिंदे करीत आहे.






