जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – शहरातील गणेश कॉलनी येथील आशादीप वस्तीगृहात दाखल असलेल्या पीडीत महिलांना नग्न करुन त्यांना नाचविले जात असल्याचा मंगळवारी सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर समोर आले.संपुर्ण राज्यभरात वसतिगृहात घडलेल्या या प्रकाराविषयी संताप व्यक्त होत आहे. गृहमंत्र्यांनी तत्काळ याप्रकरणी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
जिल्हाधिकारी यांच्याकडून नियुक्त करण्यात आलेल्या चार सदस्यांच्या चौकशी समितीने आज दिवसभर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल आठ तास आशादीप वसतीगृहात ठाण मांडले व काही मुलींचे जबाब नोंदविले आहेत.गृहमंत्र्याच्या आदेशानंतर सीआयडीआयकडून याप्रकरणाची चौकशी केली जात असून सीआयडीने तक्रारदारांचे जाब जबाब नोंदविले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
गणेश कॉलनीतील उच्चभ्रु वस्तीत असलेल्या आशादीप वसतिगृहातील घडलेल्या या प्रकरणाचे पडसाद आज थेट विधानसभेत उमटले. त्यावरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशी समिती नेमण्याची घोषणा विधानसभेत केली. गृहमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर स्थानिक स्तरावरही वसतिगृहात घडलेल्या प्रकाराची चौकशी आता सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.
या समितीत महिला पोलीस अधिकारी कांचन काळे, मानसोपचार तज्ञ डॉ. कांचन नारखेडे आणि स्त्रीरोग तज्ञ कांचन चव्हाण अशांचा समावेश आहे. वसतिगृहातील प्रकाराची चौकशी करण्यासाठी ही समिती आज सकाळी 10 वा. आशादीप वसतिगृहात पोहोचली. तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर सायंकाळी 7 वा. समितीच्या अध्यक्षा आणि सदस्य आशादीप वसतिगृहातून बाहेर पडले. तब्बल आठ तास याठिकाणच्या पिडीत महिलांचे जाबजबाब नोंदविण्यात आले.
याप्रकरणात व्हायरल झालेल्या व्हिडीओत माहिती देत असलेली एक तरुणी मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे तर दुसर्या पिडीत मुलीला गेल्या काही दिवसांपासून तिचे कुटुंबिय घेण्यासाठी येत होते. मात्र तिला कुटुंबियांसोबत पाठविले जात नव्हते. आजच्या घटनेनंतर संबंधित पिडीतेला तिच्या कुटुंबियांसोबत घरी पाठविल्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, या मुलीला घरी जावू दिले जात नाही, या भावनेतून काहीतरी करावे म्हणून बाहेर व्हिडीओ करणार्या तरुणांना चुकीची माहिती दिली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नागरिक म्हणतात, वसतीगृहात दोन वर्षात अनेक गैरप्रकार आजच्या घटनेबाबत वसतीगृहच्या बाजूला राहणार्या रहिवाशांकडूनही चौकशी समितीने माहिती घेतली आहे. दरम्यान येथील रहिवाशांकडून माहिती जाणून घेतली असता, या वसतीगृहात दोन वर्षापासून जो प्रकार समोर आला त्यापेक्षाही अनेक गंभीर गैरप्रकार घडले असल्याचा खुलासा पत्रकारांशी बोलतांना केला.
महिलांसोबत घडणार्या गैरप्रकाराबाबत प्रकाराबाबत बोलायला लाज वाटते, काय सांगावे, अशा शब्दात महिलांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे या परिसरातून हे वसतीगृह इतरत्र हलविण्यात यावे, अशी मागणी यावेळी महिलांनी व्यक्त केली.






