नवी दिल्ली – अनेकदा घरांच्या छतावर आपल्याला मोबाईल टॉवर्स दिसतात. रहिवासी भागामध्ये सर्रास असे प्रकार देशभरात पाहायला मिळतात. पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांसाठी हायकोर्टाने दिलेला निर्णय इथे महत्त्वाचा ठरतो.
हायकोर्टाने मोबाईल टॉवर्स घराच्या छतावर असण्याला बंदी घातली आहे. या दोन राज्यांमध्ये पुढील आदेश येईपर्यंत रहिवासी भागांमध्ये कोणत्याही व्यक्तीच्या घराच्या छतावर मोबाईल टॉवर्स आता लागणार नाहीत.याविषयी निर्णय देताना हायकोर्टाने मोबाईल टॉवर्स घराच्या छतावर असल्याने त्या व्यक्तीच्या सांविधानिक अधिकाराचे उल्लंघन होते. त्याचबरोबर त्याच्या मालमत्तेला देखील धोका पोहोचण्याची शक्यता असते, आणि हे योग्य नसल्याचे कठोर शब्दात सांगितले.
वादळी वाऱ्यामुळे असे टॉवर्स नुकसानीला कारणीभूत ठरतात. ज्या व्यक्तीच्या घरावर असे टॉवर्स आहेत त्याच्या जीवितास ही हानी पोहोचू शकते, असेही हायकोर्टाने नमुद केले. सिमरजीत सिंग यांनी यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निरिक्षण नोंदवलं.
अन्य प्रतिवाद्यांना हायकोर्टाने नोटिस जारी केली आणि संपूर्ण राज्यात समान धोरणाचा अवलंब केला जात आहे का? किंवा कोणत्या विषेश जागेसाठी स्टँड अलोन निर्देश दिले आहेत का? याचं स्पष्टीकरण देण्यास सांगितलं.






