सोलापूर (प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे सहकाऱ्याचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करणे पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाढदिवस साजरा करून कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस महेश पोरे यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव, विनोद साठे, गौरीहर गुरव, विशाल ऊर्फ मल्हारी नाईकनवरे, अंकुश साठे, वैभव बनसोडे, अस्लम आतार, महेश नाईकनवरे, राहुल नाईकनवरे यांच्यासह उपस्थित असणाऱया वीसजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेळापूर पोलीस चौकीत कार्यरत असणारे विनोद साठे यांचा वाढदिवस होता. एपीआय दीपक जाधव आणि 25 जणांनी डीजे लावून तालावर नाचत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांतून व्हायरल झाला. त्यानंतर वेळापूर पोलिसांनी या व्हिडीओच्या आधारे वाढदिवस असलेल्या विनोद साठेसह सहभागी सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव आणि 25 जणांवर गुन्हा दाखल केला. ही माहिती विभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी दिली. मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, बेकायदेशीरपणे जमाक जमवणे तसेच, 143, 188 व 269 कलमांखाली पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे.






