मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – अभिनेत्री तापसी पन्नूच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. येणाऱ्या काळात तिला कठोर कारवाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. आयकर विभागाकडून मुंबई-पुण्याबरोबरच दिल्ली हैदराबाद याठिकाणी दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू , विकास बहलसह, विक्रमादित्य मोटवाने आणि मधू वर्मा मंटेना यांच्यासह इतर व्यक्तींच्या घर व कार्यालयावर आयकर विभागाकडून छापे मारण्यात आले होते. या छाप्यात धक्कादायक माहिती आयकर विभागाच्या हाती लागली आहे. जवळपास 30 पेक्षा जास्त ठिकाणी आयकर विभागाने गेल्या दोन दिवसात छापेमारी केली.
आयकर विभागाकडून फँटम, मोशन पिक्चर्स प्रोडक्शन हाऊसच्या संदर्भात छापेमारी करण्यात आलेली आहे. या कंपन्यांकडून 300 कोटी रुपयांच्या व्यवहाराबद्दल कुठलेही समाधानकारक उत्तर देण्यात आलेले नाही, असे आयकर विभागाकडून सांगण्यात आलेला आहे. तापसी पन्नूकडून पाच कोटी रुपयांची कॅश रिसिप्ट आयकर विभागाला मिळाली असून यासंदर्भात अधिक तपास सुरू असल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केलेले आहे.
अनुराग कश्यप, मधू वर्मा अँटेना आणि विकास बहल यांच्यावर आयकरात चोरी केल्याचा आरोप केला होता. आयकर विभागाने यांच्या केलेल्या चौकशीमध्ये आतापर्यंत 20 कोटी रुपयांच्या कराविषयी आयकर विभाग तपास करत आहे. आयकर विभागाकडून 2 टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्यांवर देखील छापा मारण्यात आला होता. या छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल डेटा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ईमेल, व्हाट्सअॅप चॅट आणि हार्ड डिस्कच्या माध्यमातून हा डेटा मिळाल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे. या बरोबरच आयकर विभागाला सात बँक लॉकर मिळाले असून अजूनही तब्बल 28 ठिकाणी छापेमारी सुरू असल्याचं आयकर विभागामार्फत स्पष्ट करण्यात आलं आहे.
आयकर विभागाने मुंबईत फँटम फिल्मच्या जोगेश्वरी येथील कार्यालयावर देखील छापा टाकला होता. दिग्दर्शक अनुराग कश्यप राहत असलेल्या ओशिवरा परिसरातील इमारतीवर आणि अभिनेत्री तापसी पन्नू राहत असलेल्या गोरेगाव परिसरातील घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे.






