मुंबई – पोलिस उपनिरीक्षक नितेश सूर्यभान देशमुख यांचं आज पहाटे १.५२ वाजण्याच्या सुमारास निधन झालं आहे. नितेश यांना पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते ३२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दीड वर्षांची मुलगी आणि भावंडे असा परिवार आहे. नितेश देशमुख यांचं अचानक निधन झाल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल येणं अद्याप बाकी असल्यानं त्यांचा मृतदेह शताब्दी रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आला आहे.
मृत्यूपूर्वी नितेश देशमुख यांची कोविड-१९ची चाचणी करण्यात आली होती. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यावरच नितेश देशमुख यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने नितेश देशमुख यांनी पत्नी आणि दीड वर्षीय मुलीला मूळगावी सोडलं होतं. मृत्यूची घटना समजताच बांगुर पोलीस ठाण्यातील सहकाऱ्यांसह त्यांच्या बॅचमधील मित्रमंडळींना धक्काच बसला आहे. अतिशय गुणवान व्यक्तीमत्व असलेले नितेश देशमुख यांचे अचानक जाणे सर्वांसाठी धक्कादायक ठरलं आहे.







