चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील हिरापुर रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावर मातीचे भरलेले ट्रॅक्टरचा अचानक टायर फुटल्याने ट्रॉली उलटून त्याखाली दोन मजूर दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. एकटा रविवारी दुपारी सुमारे 2 वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
चाळीसगाव हिरापुर रोडवर मातीने भरलेले ट्रॅक्टर (विनानंबर) जात असताना, अचानक टायर फुटल्याने हिरापुर रेल्वे स्थानकाजवळ ट्रॉली उलटून त्याखाली दबल्याने दोन मजूरांचा मृत्यू झाला. सागर रमेश कोळी (वय- २८ रा. पाटखडकी बायपास) व बंडू भास्कर जाधव ( वय-३० रा. रांजणगाव) अशी या मजुरांची नावे आहेत.
दरम्यान रस्त्याने खासदार उन्मेश पाटील हे जात असताना तात्काळ त्यांनी रुग्णवाहिका बोलावून ग्रामीण पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना घटनेबाबत माहिती देऊन ट्रॉलीखाली दबलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.
सागर रमेश कोळी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुले आहेत. तर बंडू भास्कर जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास चाळीसगाव पोलिस करीत आहे






