गॅस भरण्यासाठी रिक्षाचालक थांबला अन सादर केलं बहारदार लावणी नृत्य

रस्त्यावरुन येजा करणाऱ्या नागरीकांनाही हे नृत्य पाहण्याचा मोह आवरला नाही

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – व्यवसायानं रिक्षाचालक असलेल्या बाबा कांबळे यांनी केलेल्या लावणी नृत्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. गॅस भरण्यासाठी थांबलेल्या बाबा कांबळे यांनी मित्रांच्या मनोरंजनासाठी लावणीवर नृत्य केलं आणि बघता बघता त्यांचं नृत्य राज्यभर गाजलं. नटरंग चित्रपटातील जाऊद्या ना घरी वाजले की बारा या लावणीवर केलेल्या नृत्याला नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी बाबा कांबळे हे अन्य सहकाऱ्यांसमवेत बारामतीत माळेगाव रस्त्यावरील पंपावर आपल्या रिक्षात गॅस भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी वीज नसल्यानं तीन तास थांबावं लागेल असं सांगण्यात आलं. तीन तास काय करायचं असा विचार सुरु असतानाच बाबा कांबळे यांनी एका लावणीवर नृत्य सुरु केलं.. त्यांचं हे नृत्य पाहून त्यांचे रिक्षाचालक सहकारीही तिथे आले. रस्त्यावरुन येजा करणाऱ्या नागरीकांनाही हे नृत्य पाहण्याचा मोह आवरला नाही. त्यातच काहींनी त्यांचं हे नृत्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं.. आणि बघता बघता हा व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाला..

बारामती तालुक्यातल्या गुणवडी येथील रहिवासी असलेले बाबा कांबळे हे ग्रामपंचायत सदस्य आहेत.. त्यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड आहे.. त्यातूनच त्यांनी विविध नृत्य प्रकार आत्मसात केलेत.. त्या दिवशी फावला वेळ मिळाला आणि मित्रांचं मनोरंजन व्हावं यासाठी हे नृत्य केल्याचं बाबा कांबळे सांगतात.

सहज गंमत म्हणून केलेल्या नृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं बाबा कांबळेही आनंदात आहेत. आपण कधी विचारही केला नव्हता की या नृत्याचा व्हिडीओ इतका व्हायरल होईल. पण, आता व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आपला आनंद गगनात मावत नाही, असे बाबा कांबळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here