टोंक (राजस्थान) – महिला दिन साजरा होऊन अवघे दोन दिवसच उलटले असताना एक लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे. राजस्थानमध्ये काही महिलांनीच प्रेमप्रकरणातून एका आई-मुलीला भररस्त्यात विवस्त्र करुन मारहाण केल्याचा अमानुष प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर वायरल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील डेठाणी गावातील हा संतापजनक प्रकार आहे. सोशल मिडीयावर वायरल होणारा तो व्हिडीओ महिन्याभरापूर्वीचा आहे. त्या व्हिडीओत एक महिला आणि तिच्या मुलीला काही महिला भररस्त्यात विवस्त्र करुन मारहाण करत असल्याचे दिसत आहे. त्यांच्यासोबत काही पुरुष देखील असून ते मारहाण करणाऱ्या महिलांना मदत करत आहेत. याबाबत विभागातील वरिष्ठ अधिकारी चक्रवर्ती सिंह राठोड याांनी हा व्हिडीओ तपासून त्याची गंभीरपणे चौकशी केली जाईल असे सांगितले आहे.
सदर मुलगी ही बागरिया जातीतील असून तिचे एका विवाहीत पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. ती त्या पुरुषासोबतच राहायची. मात्र त्या दोघांमध्ये काहीतरी वाद झाल्यानंतर ती त्याला सोडून आईच्या घऱी आली. याचा राग तिच्या बॉयफ्रेंडला व त्याच्या नातेवाईकांना आला होता. त्याने मुलीला व तिच्या पालकांना चर्चा करण्यासाठी बोलावले होते. त्या जेव्हा त्याच्या घरी आल्या त्याने व त्याच्या नातेवाईकांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीत हे प्रकरण गंभीर असून आरोपींना लवकरच अटक करणार आहे. आरोपी खानाबदोश जातीचे आहेत. ज्यांना पकडण्यासाठी पोलीस जागोजागी छापेमारी करत आहेत. या आरोपींना पकडण्यासाठी दोन टिम तयार केल्या असून आरोपीची ओळख पटलेली आहे.






