मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – गेल्या काही दिवसांपासून राज्यात पूजा चव्हाण कथित आत्महत्या, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणांवरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला असून मनसुख हिरेन प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचा राजीनामा मागितला जात आहे.
राज्यात ही परिस्थिती असताना मुंबई पोलीस दलाच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
शरद पवार आणि विश्वास नांगरे पाटील यांच्या भेटीबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांची राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा झाली. त्याच प्रमाणे डेलकर, मनसुख हिरेन आणि वाझे प्रकरणावर देखील या भेटीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याच प्रमाणे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी याच्या घराबाहेर स्फोटके भरलेली कार पार्क करण्यात आली होती. या प्रकरणावर देखील दोघांची चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नांगरे पाटील हे पवार यांना त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेटले. दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचे समजते.
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी स्फोटके भरलेली कार सापडणे आणि त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मृत्यू होणे आणि त्यात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आरोप होणे यामुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. सचिन वाझे यांचा या प्रकरणाशी कशा प्रकारचा संबंध आहे यावर पवार आणि नांगरे पाटील यांच्यात चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.






