नवी दिल्ली – केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता पुन्हा ‘भारत बंद’चं आवाहन केलं आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी २६ मार्चला ‘भारत बंद’चा इशारा दिला आहे. येत्या २६ मार्चला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ४ महिने पूर्ण होत आहेत. तर इंधन दरवाढीविरोधात शेतकरी संघटना आणि कामगार संघटना येत्या १५ मार्चला निदर्शनं करणार आहे. तसंच १९ मार्चला मंडी ‘बचाओ-खेती बचाओ’ आंदोलन करणार. सिंघू सीमा, टीकरी सीमा आणि गाझीपूर सीमेवर अजूनही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.
वेगवेगळ्या राज्यांमध्ये शेतकरी सभा घेण्यात येत आहेत. शेतकऱ्यांचा या सभांना मोठा पाठिंबा मिळत आहे. संपूर्ण देशात शेतकरी आंदोलनाची ठिणगी टाकली जात आहे, अशी माहिती किसान मोर्चाचे सदस्य शेतकरी नेते गुरनाम सिंग चढुनी यांनी दिली.
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या वर्षी पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केले होते. यानंतर पंजाब- हरयाणा सीमेवर तणावाचे वातावरण होते. सिंघू सीमेवर दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखले. यामुळे शेतकऱ्यांना दिल्लीत घुसता आलं नाही. आता दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.






