मुंबई (प्रतिनिधी) –भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत सध्या एकदम फॉर्ममध्ये असून सगळीकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आधी ऑस्ट्रेलिया आणि नंतर इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत ऐन मोक्याच्या क्षणी केलेल्या जबरदस्त खेळीमुळे ऋषभ पंत सध्या चर्चेत आहे. यादरम्यान रोहित शर्माने ऋषभ पंतसाठी प्रसारमाध्यमांना त्याच्यावर दबाव न आणण्याची विनंती केली आहे.
इंग्लंडविरोधातील टी-२० मालिकेआधी रोहित शर्माने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने ऋषभ पंतला जर त्याच्या मनाप्रमाणे खेळण्याची संधी दिली तर तो असाच दमदार कामगिरी करत राहील असा विश्वास व्यक्त केला आहे.”ऋषभ पंतला आम्ही एकटे सोडले असून, जेव्हा त्याच्यावर कुठलाही दबाव नसतो तेव्हा तो उत्कृष्ट कामगिरी करतो. याही पुढे त्याच्या चांगल्या खेळी बघायच्या असतील तर, त्याला एकटे सोडणे गरजेचे आहे. माझ्या संघ व्यवस्थापनाने ती तयारी दाखवली आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टीसाठी तयार आहात का? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे,” असेही तो म्हणाला.
“इथून पुढे त्याची चांगली कामगिरी पाहण्याची संधी आपल्याला यातून मिळणार आहे. त्याला देखील त्याच्या कारकिर्दीत मागे वळून पाहण्याची गरज पडणार नाही,” असे प्रोत्साहन पर शब्द देखील रोहित शर्माने वापरले.






