नंदुरबार जिल्हा बनतोय सटट्यांचा मुख्य केंद्रबिंदू
नंदुरबार (प्रतिनिधी विजय निकम) – नंदुरबार जिल्हा व परिसरात मोठ्या प्रमाणावर सट्टा व मटका अड्डे बिनधास्तपणे सुरू असून याकडे पोलीस प्रशासन कानाडोळा करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेत गजबजलेल्या ठिकाणी सट्टा घेण्याचें काम राजरोसपणे सुरू आहे. नंदुरबार शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अधिकारी वर्ग कार्यरत आहेत. पोलीस प्रशासनाकडून सध्या कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत असे असताना या कोणाच्याही नजरेत सट्टा व मटक्याचे अड्डे का दिसत नाहीत? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
का मग पोलीस प्रशासनाच्या संमतीनेच हे सारे सुरू आहे? अनेक प्रसारमाध्यमांनी याबद्दल बातमी प्रसारित करुन देखील कारवाई होतांना दिसत नाही. जिल्हात अशाच प्रकारे अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून कोणताही विभाग यावरती कारवाई करण्यास तयार नाही. कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक संकटात असलेले आदिवासी बांधव मात्र या सटट्यांच्या आहारी जाऊन कफल्लक होत आहेत. यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत तरी या अवैध धंद्यांना वेळीच चाप बसला नाही तर भविष्यात नंदुरबार जिल्हा सट्टा व मटक्याचे राज्यातील मुख्य केंद्रस्थान बनेल यात शंकाच नाही.
या सट्टा व मटका पेढ्यांपुढे पोलीस प्रशासन कशामुळे हतबल झाले आहे, कारवाई करताना काही राजकीय दबाव तर नाही ना हे देखील शोधणे महत्त्वाचे आहे . सर्वसामान्य जनतेवर सहज कारवाईचा दंडुका उगारणारे पोलीस या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालताना मात्र का मागे सरकतात असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.






