स्वरक्षण, धर्माचरण आणि आत्मनिर्भरता या आज महिलांच्या मूलभूत आवश्यकता आहेत ! – कु. प्रियांका लोणे

जागतिक महिला दिनानिमित्त ‘ऑनलाईन शौर्य जागरण व्याख्यान’ !

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिला दिनानिमित्त ‘ऑनलाईन शौर्यजागरण व्याख्यान’ घेण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रियांका लोणे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

या वेळी त्या म्हणाल्या की, आपल्या सर्वांमध्ये माता दुर्गादेवी, राजमाता जिजाऊ यांसारख्या थोर वीरांगनांचा अंश आहे. आपल्यापैकी प्रत्येक स्त्रीने आत्मचिंतन करून आपल्यातील आत्मतेज आणि ईश्‍वरी तत्त्व जागृत करून आत्मनिर्भर व्हायला हवे. स्वरक्षा, धर्माचरण आणि आत्मनिर्भरता या आज महिलांच्या मूलभूत आवश्यकता आहेत.

त्या पुढे म्हणाल्या की, पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करून नव्हे, तर आपल्या महान हिंदु धर्माचे आचरण करून आपण खर्‍या अर्थाने शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर सक्षम बनू शकतो.

‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु धर्मावर आणि हिंदु स्त्रियांवर जे आघात होत आहेत, ते सतर्कतेने परतवून लावायला हवेत. या वेळी मराठवाडा, विदर्भ आणि कान्हादेश(खान्देश) प्रांत येथील २०० हून अधिक धर्मप्रेमी महिलांनी या व्याख्यानाचा ऑनलाईन लाभ घेतला.

‘महिला अबला नाही सबला आहेत. धर्मशिक्षण न मिळाल्याने आपण अयोग्य गोष्टींना बळी पडतो. आजपासून आम्ही धर्माचरण करण्यास स्वतःच्या परिवारापासून आरंभ करू’, असे अभिप्राय उपस्थित महिलांनी नोंदवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here