महाराष्ट्र–कर्नाटक वाद पेटला; कोल्हापुरात एसटीवर दगडफेक

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – शिवसेनेचे बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीवर ‘कन्नड रक्षण वेदिके’च्या (करवे) गुंडांनी केलेला हल्ला तसेच गाडीवरील शिवसेनेचा फलक आणि भगव्या ध्वजाची तोडफोड करण्याचा प्रयत्न याचे तीव्र पडसाद सीमाभागासह महाराष्ट्रात उमटले आहेत.

कोल्हापुरात शिवसेनेने जोरदार आंदोलन करीत कर्नाटक पासिंगच्या गाडय़ांना महाराष्ट्रात प्रवेशबंदी केली आहे. शिवसैनिकांनी सीमेवरील कोगनोळी टोलनाक्यावर धडक देत एसटी बसेस, ट्रक्सवर ‘जय महाराष्ट्र’ असे स्टिकर्स लावून त्या गाडय़ा परत पाठविल्या. बेळगावात मराठी भाषिकांनी टिळक चौकात लावलेला बेकायदेशीर लाल-पिवळा ध्वज उतरवून ‘करवे’च्या गुंडांना सणसणीत उत्तर दिले आहे.

कोल्हापूर बसस्थानकात कर्नाटकातील एका व्यक्तीने एसटी बसवर दगडफेक केली. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पेटला असून, वातावरण तणावपूर्ण बनले आहे. दोन्ही राज्यांतील एसटी बससेवा बंद करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या करवीर येथील गांधीनगर परिसरातील कन्नड फलकांना काळे फासून अनेक फलक उतरविण्यास भाग पाडले. शिवसेना झिंदाबाद, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जयघोष करत, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसैनिकांनी गांधीनगर परिसरातील व्यापारी संपुलातील कन्नड फलकांना काळे फासून, कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध केला. शिवसैनिकांच्या दणक्याने इतर व्यावसायिकांनीही आपापल्या दुकानावरील कन्नड फलक स्वतः उतरून घेत सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी ठाम असल्याचे दाखवून दिले.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, शहरप्रमुख सयाजी चव्हाण व इतरांनी इचलकरंजी एस. टी. स्थानकात जाऊन जोरदार घोषणा देत कर्नाटक बसला घेराव घालून प्रवाशाना खाली उतरण्यास सांगितले आणि प्रवाशांविना गाडय़ा पिटाळून लावल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here