कोल्हापूर : ४०२ वाहन चालकांवर कारवाई; ३ लाख ८ हजार रुपयांचा दंड वसूल

कोल्हापूर

कोल्हापूर (प्रतिनिधी रहिम पिंजारी) | शहरातील प्रमुख चौक आणि महाविद्यालय परिसर असलेल्या भागात विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४०२ वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण ३,०८,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई महावीर कॉलेज, विवेकानंद कॉलेज, शहाजी कॉलेज, गोखले कॉलेज, सायबर चौक आणि खरी कॉर्नर या परिसरामध्ये सकाळी १०:३० ते १२:३० आणि सायंकाळी १७:०० ते १८:३० या वेळेत पार पडली. या मोहिमेत प्रामुख्याने अल्पवयीन वाहन चालक, ट्रिपल सीट वाहन चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट वापरणारे आणि कर्णकर्कश हॉर्न वाजवून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

या कारवाईचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे: ट्रिपल सीट (तिब्बल सीट) प्रकरणी २२ केसेस करून २२,००० रुपये दंड आकारण्यात आला; वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्याप्रकरणी १६ केसेसमधून २५,००० रुपये वसूल झाले; विहीत नमुन्यात नंबर प्लेट नसलेल्या ४४ जणांवर कारवाई करून ३६,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला; फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या २ केसेसमधून १,५०० रुपये दंड वसूल झाला; वाहनामध्ये मॉडिफिकेशन केल्याप्रकरणी ३ केसेसमधून ३,००० रुपये दंड आकारण्यात आला; सिग्नल जंप करणाऱ्या ४८ वाहन चालकांवर कारवाई करून २८,००० रुपये दंड वसूल झाला; लायसन्स जवळ न बाळगणाऱ्या १०९ जणांवर कारवाई करून ७४,५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला; लायसन्स न काढणाऱ्या ४ जणांवर कारवाई करून २०,००० रुपये वसूल झाले; प्रवेश बंद मार्गातून वाहन चालविणाऱ्या ३८ जणांकडून २४,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला; कर्कश हॉर्न वाजवणाऱ्या ९ जणांवर कारवाई करून ७,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला; तसेच इतर १०७ केसेसमधून ६६,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. अशा प्रकारे एकूण ४०२ केसेस करून ३,०८,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि शहर विभागाच्या मा. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोनि संतोष डोके, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोनि श्रीराम कन्हेरकर, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोनि विकास जाधव, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोनि किरण लोंढे, तसेच शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भविष्यातही अशाच प्रकारची कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here