कोल्हापूर (प्रतिनिधी रहिम पिंजारी) | कोल्हापूर शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘हॉटेल इरा’ येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास व्हीनस कॉर्नर येथील ‘हॉटेल इरा’च्या चौथ्या मजल्यावर ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी काही जण कोणत्याही परवान्याशिवाय बेकायदेशीररित्या तीन पत्ती नावाचा जुगार खेळत आणि खेळवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी १ सप्टेंबर २०२६ रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस शिपाई गौरव बाजीराव चौगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळावरून १०,६३५ रुपये रोख, ८७,००० रुपये किमतीचे मोबाईल फोन आणि १,९०,००० रुपये किमतीची वाहने असा एकूण २,८७,६३५ रुपयांचा जुगाराचे साहित्यासह मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जुनेद अस्लम बारगीर (वय २१, रा. पट्टण कोडोली), गजानन गोविंद तळसकर (वय २८, रा. कोल्हापूर), अनिकेत अनंत ओतारी (वय ३८, रा. कोल्हापूर), निलेश बाबुराव गवळी (वय ४९, रा. शिंगणापूर), सुहास बळवंत चौगुले (वय २३, रा. कोल्हापूर), प्रकाश मल्लाप्पा पाटील (वय ४०, रा. कोल्हापूर), शुभम सुनिल सुर्यवंशी (वय ३०, रा. कोल्हापूर), कृष्णात गुणवंत घोरपडे (वय ३६, रा. कोल्हापूर), विजय चंदर भोसले (वय ४९, रा. कोल्हापूर) आणि शिवाजी मोरे (रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) या १० आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्या या सर्व आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४ आणि ५ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल (पोहेकाँ) ४०९ जाधव करत आहेत.







