कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यावरील हल्ल्यानंतर आज एका रोड शो मध्ये सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी मागच्या रॅलीमध्ये त्यांना जीवे मारण्याचा कट होता असा धक्कादायक दावा केला आहे. व्हीलचेअरवर बसून त्या या रोड शो मध्ये सहभागी झाल्या होत्या.
”आम्ही आमचा लढा सुरू ठेवणार. मला अजूनही खूप वेदना होत आहेत पण मला लोकांचे दुःख जास्त जाणवतेय. आपल्या या भूमीच्या बचावा करता आम्ही खूप काही सहन करत आहोत आणि आणखीन ही सहन करू मात्र एखाद्या भित्र्यासारखे आम्ही त्यांच्यापुढे झुकणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे. ”बंगाल विरोधातील सर्व कट आम्ही उधळून लावू मी या दुखावलेल्या पायाला घेऊन व्हीलचेअरवर बसून संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहे. जखमी वाघ सर्वात खतरनाक प्राणी असतो” असे देखील त्या म्हणाल्या.
ममता बॅनर्जी या नंदीग्राम येथून निवडणूक लढवत आहेत. प्रचाराच्या दरम्यान बिरूलिया येथे मंदिरासमोर त्यांच्या गाडय़ांचा ताफा थांबला. कारच्या बाहेर उतरून त्या देवाला नमस्कार करत असताना चार-पाच लोक धावत आले आणि दरवाजा लोटला. दरवाजा त्यांच्या पायाला लागला. पायाला दुखापत झाली. त्यांना वेदना होत होत्या. छातीत कळ आली. त्यांना ग्रीन कॉरिडोर करून तातडीने मिदीनीपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात नाही तर, विरोधकांनी जाणुनबुजून केलेला हल्ला आहे. आपल्या दौऱयात जिल्हा पोलीसप्रमुख, स्थानिक पोलिसांचा बंदोबस्तही नव्हता, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
आजवर ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्यांचा इतिहास –
16 ऑगस्ट 1990 रोजी तत्कालीन सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे (एम) कार्यकर्ते लालू आलम यांनी ममता यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यावेळी त्या युवा काँग्रेसच्या नेत्या होत्या. हल्ल्यानंतर त्या एक अत्यंत लढाऊ नेत्या, काँग्रेसच्या फायर ब्रॅण्ड नेत्या म्हणून नावारूपाला आल्या.
2006 ते 2007 दरम्यान ममता यांच्यावर सीपीएमच्या गुंडांनी अनेकदा हल्ले केले. त्यांचा नंदिग्राममधील प्रवेश रोखण्यासाठी कारवर बॉम्ब फेकले व गोळ्या झाडल्या. 2007 मधील भूसंपादनाविरोधातील ऐतिहासिक आंदोलन आणि पोलिसांशी झालेल्या संघर्षानंतर ममतांचे नेतृत्व आणखी प्रखर बनले होते.
जुलै 1993 मध्ये सीपीएमच्या कार्यकर्त्याने मूकबधिर मुलीवर बलात्कार केला होता. संबंधित नराधमाला तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी ममता यांनी तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या चेंबरसमोर धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिसांनी ममता यांचे केस पकडून व्हॅनमध्ये बसवले होते व लॉकअपमध्ये टाकले होते. या घटनेनंतर त्या खूप चर्चेत आल्या होत्या. पोलिसांच्या मारहाणीमुळे ममता पुढील काही आठवडे रुग्णालयात दाखल होत्या.
2010 मध्ये रेल्वे मंत्री असताना त्याच्या ताफ्यातील कारला ट्रकने धडक दिली होती. मला जीवे मारण्याचाच हा कट होता, असा आरोप ममता यांनी केला होता. या हल्ल्याच्या घटनांचा ममता यांना राजकीय प्रवासात फायदा झाला व 2011 मध्ये त्यांचे सरकार सत्तेत आले. त्यांनी सीपीएमच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीचे 34 वर्षांचे सरकार उखडून टाकले.






