पुणे महापालिकेच्या उपमहापौर सरस्वती शेंडगेंचा राजीनामा

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – महापालिकेच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी पदाचा राजीनामा पक्षाच्या पदाधिकार्‍यांकडे सुपूर्द केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चेनंतरच यावर निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले. विधानसभा निवडणूकीनंतर म्हणजेच साधारण दीडवर्षांपूर्वी उपमहापौरपदी शेंडगे यांना भाजपने संधी दिली होती.

सव्वा वर्षासाठी हे पद असेल असे त्यावेळी भाजपच्या तत्कालीन शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर हे पद रिपाईला देण्याचे ठरले होते. त्यानुसार शेंडगे यांचा सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर रिपाईकडून उपमहापौरपदाची मागणी केली होती. त्यासाठी रिपाईने गटनेत्या सुनिता वाडेकर यांचे नावही निश्चित केले. मात्र, भाजपने उपमहापौर शेंडगेचा राजीनामा घेणे टाळले होते. केवळ शेंडगेंचाच राजीनामा का असा प्रश्न उपस्थित सर्वच पदाधिकारी बदला, असा सूरही पक्षात उमटला होता. त्यामुळे शेंडगे यांना अभय मिळाल्याचे चित्र होते. मात्र, सोमवारी पक्ष पदाधिकार्‍यांकडून तडकाफडकीने शेंडगे यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. त्यावर प्रदेशाध्यक्ष पाटील व विरोधी पक्षनेते फडणवीस हे निर्णय घेतील असे सांगण्यात आले.

पक्षाने सांगितल्याने शेंडगे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता हा राजीनामा स्‍वीकारला जाणार का, स्‍वीकारल्यास रिपाईला या पदाची संधी देणार की भाजप पुन्हा स्वत:कडे हे पद ठेवणार, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here