शहादा तालुक्यात वीज वितरण कंपनीची धडक कारवाई; पावणेचार लाखांची वीजचोरी

शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – तालुक्यातील सारंगखेडा व ब्राम्हणपुरी गावात वीज मीटरमध्ये फेरफार करुन तब्बल 3 लाख 75 हजार 60 रुपयांची 23 हजार 207 युनीट वीज चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सारंगखेडा व शहादा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा तालुक्यातील ब्राम्हणुपरी येथील मुरलीधर गोविंद पाटील याने घरातील वापरातील वीज मीटरच्या फेज सिटी सेकंडरीपासून पीसीबीवर जाणार्‍या काळया रंगाच्या वायरमध्ये एक रोधक टाकून मीटर मंदगतीने चालवून वीज चोरी करतांना आढळून आला. त्याने 2 लाख 88 हजार 890 रुपयांची 15 हजार 830 युनीट वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी अतिरिक्त कार्यकारी अभियंता हेमंत ठोसरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक धिरसिंग वळवी करीत आहेत.

सारंगखेडा ता.शहादा येथील सोनराज चंदनमल जैन, विजय सोनराज जैन यांनी दोन वर्षापासून आपल्या वीज मोजणी मीटरमध्ये फेरफार करुन 58 हजार 170 रुपयांची 4 हजार 734 युनीटची चोरी केली.याप्रकरणी अतिरिक्त कार्यकारी अभियंता हेमंत ठोसरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सूर्यवंशी करीत आहेत.

सारंगखेडा गावात कळंबू रस्त्यावर इस्लामोद्दीन अब्दुल लोहार याने गेल्या दोन वर्षापासून वीज मोजणी मीटरमध्ये फेरफार करुन 28 हजार रुपयांची 2 हजार 643 युनीट वीज चोरी केली. याबाबत अतिरिक्त कार्यकारी अभियंता हेमंत ठोसरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस नाईक सूर्यवंशी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here