बेलगाव (कर्नाटक) – भाजपचे कर्नाटकातील माजी मंत्री रमेश जारकीहोली यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या तरुणीचे अपरहण झाले आहे. सदर तरुणीच्या पालकांनी तिचे अपहरण झाल्याची तक्रार बेलगावमधील एपीएमसी पोलीस ठाण्यात दाखल केली असून तिचा जीव धोक्यात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी सदर महिलेचे व जारकीहोली यांचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्या व्हिडीओत ती व तत्कालिन मंत्री रमेश जारकीहोली हे आक्षेपार्ह स्थितीत दिसत होते. त्यावेळी त्या महिलेने एका सामाजिक कार्यकर्त्याच्या साहाय्याने जारकीहोली यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. जारकीहोली यांनी जॉब देण्याचे आश्वासन देत माझा लैंगिक छळ केला अशी तक्रार तिने दिली होती.
सदर महिला हे प्रकरण सुरू झाले तेव्हापासून तिच्या घरी गेली नव्हती. फोनवरून ती आई वडिलांच्या संपर्कात होती. मात्र आता तिचा फोन देखील बंद असून तिने काही दिवसांपूर्वी तिच्या जीवाला धोका असल्याचे पोलिसांना सांगितले होते. तसेच काही दिवसांपूर्वी तिचा आत्महत्येचे विचार मनात येत असल्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर आला होता.
‘जेव्हा ते व्हिडीओ व्हायरल झाले त्यावेळी मी माझ्या मुलीला फोन करून त्याबाबत विचारले होते. मात्र ती म्हणालेली की त्या व्हिडीओमधली मुलगी दुसरी कुणीतरी आहे. मी काहीही चुकीचं केलेलं नाही असं ती म्हणाली होती. त्यावेळी मी तिला घरी येण्यास सांगितले तिने नकार दिला व म्हणाली माझ्या जीवाला धोका आहे. त्यानंतर आम्ही फोनवरून तिच्या संपर्कात होतो. मात्र आता तिचा फोन बंद आहे’, असे तिच्या आईने प्रसारमाध्यमांना सांगितले.






