औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – गुन्ह्यात न्यायालयाने लावलेली हजेरी बंद करण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना दोन हवालदारांना रंगेहाथ पकडण्यात आले. शेख अफसर शेख इलोमोद्दीन (५२ रा. हुसेन कॉलनी, पुंडलीकनगर रोड) आणि रत्नाकर बोर्डे (५०, रा. म्हाडा कॉलनी, मूर्तिजापूर) अशी त्यांची नावे आहेत. एसीबीने एमआयडीसी सिडको ठाण्यात ही कारवाई केली.
तक्रारदारविरुद्ध एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्यांना ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. . ही हजेरी बंद करून गुन्ह्यात मदत करण्यासाठी हवालदार शेख आणि बोर्डे यांनी त्यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यांनी याची तक्रार एसीबीकडे केली.
अधिकाऱ्यांनी सापळा रचून शेख आणि बोर्डे यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई एसीबीचे अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर अधीक्षक डॉ. अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विकास घनवट, अंमलदार मिलिंद इप्पर, संतोष जोशी, राजेंद्र जोशी, देविसिंग ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली.






