आटपाडी (प्रतिनिधी) – जनतेची नि:स्पृह सेवा करणाऱ्यांना त्याकाळातले लोक भर भरून साथ देत असत आणि जनतेचा विश्वास सार्थ करण्यासाठी संपूर्ण जीवन पणाला लावण्याचे काम नेते मंडळी करीत, अशा प्रामाणीक नेते मंडळीत आण्णासाहेब लेंगरे यांची गणना होत असे ते खरेखुरे अष्टपैलू लोकनेते होते असे गौरवोदगार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष सुशांत देवकर यांनी येथे बोलताना काढले .
आटपाडी — कवठेमहंकाळ मतदार संघाचे माजी आमदार आण्णासाहेब लेंगरे यांच्या २६ व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते . प्रारंभी माजी आमदार आण्णासाहेब लेंगरे यांच्या प्रतिमेचे पुजन राष्ट्रवादीचे मतदार संघाचे अध्यक्ष सुशांत देवकर, राष्ट्रवादीचे खानापूर तालुका अध्यक्ष किसनराव जानकर, काँग्रेस आयचे तालुका अध्यक्ष डी.एम .पाटील सर आणि आण्णासाहेब लेंगरे यांच्या कन्या पंचायत समितीच्या माजी सभापती रुक्मीणीताई यमगर यांच्या हस्ते करण्यात आले .
आटपाडी तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अॅड . उस्मान नबी शेख यांच्या निधनाबददल त्यांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली . राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रा . एन . पी . खरजे यांनी आपल्या स्वागतपर भाषणात आण्णासाहेब लेंगरे यांचा फोटो आटपाडी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस भेट देण्याचा मनोदय बोलून दाखविला .
राष्ट्रवादीचे आटपाडी तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकात आण्णासाहेब लेंगरे यांनी राज्याला आदर्श ठरेल असे सर्व समावेशक राजकारण केल्याचे सांगून यापुढच्या काळात आण्णासाहेबांची जयंती पुण्यतिथी व्यापक स्वरूपात साजरी करण्याचा मनोदय व्यक्त केला .
कसल्याही प्रकारची आदळआपट , आक्रस्ताळेपणा न करता, आपले म्हणणे शांत, संयमाने प्रसंगी परखडपणाने मांडणारे माजी आमदार आण्णासाहेब लेंगरे हे हजारोंच्या अंतःकरणात अढळ स्थान निर्माण करणारे खरेखुरे लोकनेते होते .असे स्पष्ट करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी आण्णासाहेब लेंगरे यांच्या नावाने आटपाडी येथे १००० लोकांच्या क्षमतेचे बहुउद्देशीय सभागृह साकारण्यासाठी आण्णासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी पालक मंत्री ना. श्री जयंतराव पाटील साहेबांकडे साकडे घालावे असे आवाहन केले .
जीवाभावाचे शेकडो कार्यकर्ते घडविणाऱ्या आण्णासाहेब लेंगरे यांनी आपल्या रांगड्या ,नर्म विनोदी प्रसंगी आपल्याच पक्षातल्या नेत्यांना ठणकावून सांगणाऱ्या भाषेतून आपला काळ गाजविला . जात ,पात, धर्माच्या पलीकडचे राजकारण समाजकारण करणाऱ्या आण्णासाहेबांचा आदर्श नव्या पीढीने घ्यावा असे मत खानापूर आटपाडी मतदार संघाचे माजी अध्यक्ष आनंदराव बापू पाटील यांनी यावेळी व्यक्त केले .
३३ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत काँग्रेस पक्षावर अभेद्य निष्ठेने प्रेम करणाऱ्या आण्णासाहेब लेंगरे यांनी विधानसभेतल्या आपल्या लक्षवेधी भाषणातून राज्य सरकार आणि सर्वच लोकप्रतिनिधींना आपलेसे केले होते . २६ वर्षापूर्वी आण्णासाहेबांनी गाजविलेले ३३ वर्षाचे कार्यकर्तृत्व आजही लोकांना प्रेरणा देणारे आहे . अशी अशी भावना काँग्रेस आयचे आटपाडी तालुका अध्यक्ष डी एम. पाटील यांनी बोलून दाखविली .
आपले राजकीय जीवन “आण्णासाहेब लेंगरे” या मंत्रांनेच समृद्ध झाल्याचे माजी सभापती विजयसिंह पाटील यांनी सांगीतले . तर जि.प . चे माजी समाज कल्याण समिती सभापती तथा खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किसनराव जानकर यांनी या माणसातल्या देवमाणसाला आमच्या समोर साक्षात उभा करण्याचे काम उस्मान नबी शेख साहेब यांनी केले ,याच देवत्वला समोर ठेवून काम करण्याचे याआधी केले आणि यापुढेही करणार असल्याचे स्पष्ट केले .
राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस विजय पुजारी, राजेवाडीचे नामदेव पुजारी गुरुजी, माडगुळे चे भाऊसाहेब लिंगडे यांची भाषणे झाली. यावेळी आटपाडी तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती रुक्मीणीताई यमगर, राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या जिल्हा उपाध्यक्षा इंजिनीयर सौ. अनिता पाटील, युवा नेते विनायकराव मासाळ , आण्णासाहेब लेंगरे यांचे नातू युवा नेते गणेश लेंगरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सुरज पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुका अध्यक्ष जालींदर कटरे ,राष्ट्रवादी तालुका सोशल मिडीया अध्यक्ष किशोर गायकवाड, पदवीधर मतदार संघ प्रदेश प्रतिनिधी भाऊसाहेब देशमुख, तालुका सरचिटणीस समाधान भोसले , शीतल गुजर लालासाहेब भिसे, सुखदेव खताळ, सागर चवरे, प्रविण पावणे, मनोज सुतार, प्रविण बाबर, संगिता जाधव, काजल लांडगे, प्रफुल्ल देशमुख, दामोदर लिंगडे हे मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे संयोजक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष, धनगर समाजाचे जिल्हयाचे नेते दत्ताभाऊ यमगर बनपुरीकर यांनी आभार मानले .






