नवी दिल्ली – देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोना महामारीचा कहर असाच कायम राहिला तर परिस्थिती हाताळणे कठीण होईल. हे लक्षात घेता कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट’ या त्रिसूत्रीवर भर द्या, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्र, केरळ, पंजाब, मध्य प्रदेशसह देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबद्दल चिंता व्यक्त करत कोरोना रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवून ते 70 टक्क्यांवर नेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हजेरी लावली नाही. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार पश्चिम बंगालला कोरोना व्हॅक्सिन उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला आहे.
देशभरात कोरोना लसीकरणाचा वेग वाढवायला हवा. तेलंगण, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये लसीकरणाचा आकडा 10 टक्क्यांवर गेला आहे. असे होता कामा नये. देशात दररोज किमान 30 लाख नागरिकांना कोरोना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. कोरोना लसीचा डोस फुकट जाणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.






