जळगाव (प्रतिनिधी सिध्दांत सोनवणे) – २० मार्च जागतिक चिमणी दिनी निसर्गमित्र जळगाव तर्फे महाराष्ट्रव्यापी ऑनलाईन चिमणी गणना हा अभिनव उपक्रम हात घेण्यात आला आहे.या चिमणी गणनेत सर्व लहान-थोर बंधु आणि भगिनींना सामील होण्याचे आवाहन पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी केले
याबाबत बुलंद पोलीस टाइम्सला माहिती देताना, ते म्हणाले की, कोविड १९ ची लागण टाळण्यासाठी नागरिकांना आपल्या घरच्या बाहेर पडण्याची गरज नाही.घरातील बागेतून,गच्चीतून,बाल्कनीतून गणना करा किंवा नोकरीच्या परिसरातून गणना करावी.गणनेत ते इतरांना सहभागी करून घेऊ शकता मात्र योग्य अंतर ठेवण्यास व मास्क लावण्यास विसरू नका असेही आवाहन त्यांनी केले आहे.गणनेचा गुगल फॉर्म मराठी अथवा इंग्रजीत भरण्याची सोय असल्याने सर्व भाषिकांना यात सहभागी होता येईल असेही ते म्हणाले.

चिमण्या दिसत का नाहीत ?
महाराष्ट्रव्यापी ऑनलाईन चिमणी गणनेचा उद्देश सांगताना पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ म्हणाले की चिमण्या हल्ली दिसत नाहीत,नाहीश्या झाल्या हा प्रश्न विचारला जातो.डोळे उघडे ठेवून जर आजूबाजूला नीट बघितले तर त्यांना सत्य परिस्थिती लक्षात येईल.आम्ही गेल्या दहा वर्षांपासून जळगांव शहर परिसरातील पक्ष्यांचा अभ्यास करीत आहोत.हा अभ्यास करीत असतांना पक्षी निरीक्षणासाठी आम्ही शहरातील काही ठिकाणं निश्चित केली आहेत.या ठिकाणी सातत्यानं भेट देवून नोंदी घेतल्या तेंव्हा आम्हाला सर्व ठिकाणी कमी जास्त संख्येत चिमण्या आढळल्या.यांवरून ही गोष्ट स्पष्ट झाली की चिमण्या नाहीशा झालेल्या नाहीत.तर त्या वाढत्या शहरी करणामुळं वेशीकडे ढकलल्या जात आहेत.शहराच्या बाहेर जिथं वस्ती विरळ आहे तिथे हमखास चिमण्या दिसतात कारण त्यांना हवा असलेला मानवी सहवास आणि मोकळ माळरान मिळतं. म्हणूनच त्यांना हवे असणारे परस-अंगण किंवा झाडोरा जिथं आहे अशा काही ठिकाणी अगदी भरवस्तीत सुद्धा त्यांचा वावर दिसून आला.आणि बहुतेक थोड्याफार फरकानं हीच स्थिती गांव /शहरांत असावी.चिमणी हा पक्षी असा आहे की जो मानवी सहवासाचा आदि आहे.पक्ष्याच्या मुबलक अन्न, निवास आणि सुरक्षित प्रजनन या तीन मूलभूत गरजा भागत असतील तर ते अगदी रहदारीच्या धबडग्याशी देखील स्वतःला जुळवून घेतात असं दिसून आलं.
मुळात सिमेंटच्या जंगलात तिला घरटं करायला जागा नाही,फ्लॅट पद्धतीमुळं दार- खिडक्या बंद म्हणून तिचं दर्शन दुर्लभ झालं असं आपल्याला वाटतं पण तसं नाही… ती आहे.तिला दाणे टिपण्यासाठी मोकळं अंगण लागते. ही सर्व स्थिति चिमणी गणनेच्या माध्यमातून तिची स्थिति समजायला मदत होणार आहे.म्हणून सर्व वयोगटातील नागरिकानी शनिवार दि.२० मार्च २०२१ रोजी जागतिक चिमण्या दिनी आमच्या ऑनलाईन पक्षी गणनेत सामील व्हावे असे आवाहन करीत आहोत.
जागतिक चिमणी दिन जणू चिंतन दिन असल्याचे आम्ही समजतो.या चिंतन दिनी किमान अशी अपेक्षा आहे की आपल्या अंगणात,परिसरात पूर्ववत चिमण्या बागडावयात,पुन्हा काऊ,चिऊ च्या गोष्टी आपल्या लहानग्यांना ऐकायला मिळव्यात असे वाटत असेल तर आपण सर्वांनी चिमणी स्नेही घर बांधणीचा व हरित नगर विकासाचा विचार करावा व त्या विचारांना चालना मिळावी ही आमची अपेक्षा आहे.नागरिकांनी अत्यंत सोप्या ऑनलाईन चिमणी गणनेत सामील व्हावे असे आवाहन आम्ही करीत असल्याचे पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ म्हणाले.
चिमणी गणने साठी शनिवार २० मार्च रोजी मुद्दाम वेळ काढा व सकाळी ०६.३० ते १०.३० अथवा दुपारी ०४.३० ते ०६.३० या वेळात केंव्हाही किमान१५ मिनिट ते जास्तीजात ३० मिनिट वेळ देऊन गणना करावी असे त्यांनी कळवले आहे.
चिमणी गणनेत सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्मची लिंक
https://forms.gle/2pj9aBc71PBmsGNT7






