पत्रिकेतील मंगळ दोष दूर करण्यासाठी शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत केले लग्न

marriage

जालंधर – विज्ञान पुढारलेले असताना आजही अनेकजण अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेले आहे. आजही जन्मपत्रिका, कुंडली दोष यासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. अशीच एक घटना जालंधर शहरात समोर आली आहे. एका शिक्षिकेने आपल्या पत्रिकेतला मंगळ दोष घालवण्यासाठी चक्क 13 वर्षाच्या मुलासोबत बळजबरीने लग्न केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

शिक्षिकेच्या पत्रिकेत मंगळदोष होता. त्यामुळे तो दोष घालवण्यासाठी पंडिताने शिक्षिकेला एका अल्पवयीन मुलासोबत प्रतिकात्मक लग्न करायला सांगितले. आता 13 वर्षांचा मुलगा आणायचा कुठून असा प्रश्न शिक्षिकेसमोर पडला होता. दरम्यान तिने ती शिकवणी घेत असलेल्या एका सातवीच्या मुलासोबतच लग्न करण्याचे ठरवले. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांना गोड बोलत त्याचा अभ्यास चांगला घेण्यासाठी त्य़ाला आठवडाभर माझ्या घरी थांबावे लागेल असे सांगितले.

शिक्षिकेने बळजबरीने त्याच्यासोबत लग्न केले. हळदी, मेहेंदी असे लग्नाआधीचे सगळे रितीरिवाज पार पडले आणि धक्कादायक म्हणजे त्याच्यासोबत मधुचंद्रही केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या शिक्षिकेने बांगड्या फोडत विधवा झाल्याचे घोषित केले. त्यानंतर कुटुंबाने शोकसभा आयोजित केली होती.

आठड्याभरानंतर जेव्हा मुलगा घरी परतला त्याने त्याच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार घरच्यांना सांगितला. ते ऐकून त्याच्या घरच्यांना धक्का बसला. ती शिक्षिका त्यांच्याशी खोटं बोलली होती. सर्व समजल्यानंतर मुलाच्या घरच्यांनी बस्ती बावा खेल पोलीस ठाण्यात याविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर आरोपी शिक्षिका आणि तिला सल्ला देणारा पंडित पोलीस ठाण्यात पोहोचले आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्याच्या घरच्यांनीही केस मागे घेतली. मात्र, याबद्दलची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच त्यांनी चौकशीचे आदेश दिले. जालंधरचे डीएसपी गुरमीत सिंह यांनी सांगितलं, की ही घटना खरच घडली आहे आणि याप्रकरणाचा तपास सुरू आहे. हे लग्न प्रतिकात्मक असलं तरीही अल्पवयीन मुलासोबत अशाप्रकारे विवाह करणं चुकीचं असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here