सातारा (प्रतिनिधी शरद मोरे) – कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून आज जावळी तालुक्यातील केळघर येथील एका फार्म हाउसमधून तब्बल 23 किलो 600 ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून, या गांजाची किंमत तीन लाख रुपये आहे. संतोष पांडुरंग पार्टे (रा. केळघर (मेढा), ता. जावळी, जि. सातारा) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केळघर येथील संतोष पार्टे याच्या फार्महाउसवर गांजा असल्याची माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी रात्री फार्म हाउसवर धाड टाकण्यात आली. या धाडीमध्ये एकूण 23.631 किलोग्रॅम गांजा जप्त केला असून, या गांजाची किंमत तीन लाख रुपये आहे. याप्रकरणी संतोष पार्टे याला अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी त्याला जावळी (मेढा) न्यायालयात हजर केले असता, न्यायमूर्ती एन. एस. काळे यांनी 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सदरची ही कारवाई पुणे सीमा शुल्क आयुक्तालयाच्या अखत्यारीत दापोली कस्टम विभागाचे उपआयुक्त अमित नायक एस. यांच्या मार्गदर्शनाखाली व जवान मधुकर भोईटे यांच्या देखरेखीखाली अधीक्षक महेश कुमार यादव यांच्यासह पथकातील निरीक्षक अमर बहादूर मौर्य, मनाली शिवप्रकाश कथले, विकास, मुकेश कुमार, एस. एम. आंबेकर, एस. एस. विलंकर, के. एल. ढेबे, व्ही. के. कात्रट यांनी ही कारवाई केली.






