मुंबई (संपादक सुनिल पाटील) – सद्यस्थितीत कोविड लसीकरणाची मोहीम ही जोरात सुरु आहे. त्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्थादेखील पुढाकार घेत आहेत. लसीकरणासाठी नागरिकदेखील उत्साहाने सहभागी होत आहे. मात्र हे लसीकरण करुन घेतांना काही गोष्टी जाणून घेतल्या नाहीत तर कोरोना लसीकरण वरदान ठरण्याऐवजी तुमच्यासाठी शाप ठरु शकते.
कोविड लसीकरण करुन घेणाऱ्या अनेकांना विचारले तर त्यांनी केवळ कोणत्यातरी संस्थेच्या आवाहनाला किंवा सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत लसीकरण करुन घेतले असते. लसीकरणाला गेले की तिथे नावनोंदणी करुन लस टोचून घेतली, अर्धा तास तिथे वाट पाहिली, पॅरॉसिटॅमॉलच्या गोळ्या घेतल्या की तिथल्या लोकांचे आभार मानून ही लोक तिथून निघून येतात. प्रत्यक्षात मात्र आपणाला कोणती लस दिली, ती मानांकनानुसार वापरली गेली आहे का? याबाबत त्यांच्याच जागरुकता नसतेच.

आता कोविड लस घेण्यासाठीची मानांकने जाणून घेता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या लसीचे कोल्डचेन मेन्टन केले आहे का हे पाहणे आत्यंतिक गरजेचे आहे. कारण या लसीची कोल्डचेन मेन्टन नसेल तर ही लस तुमच्यासाठी शाप ठरु शकते.
काय आहे कोल्डचेन आणि त्याची गरज काय?
कोव्हीशिल्ड हे व्हॅक्सीन प्राण रक्षक आहे…पण ते तितकेच नाजूकही आहे. त्याचे तापमान (टेंप्रेचर) 2ते10 डीग्री सेंटीग्रेड राखलं गेलं तरच आणि तरच ते उपयोगी आहे. आता हे तापमान राखलं गेलं नाही तर व्हॅकशीनचे इंजेक्शन म्हणजे शुध्द पाण्याचे इंजेक्शन घेतल्यासारखे होईल व त्याचा काहीही उपयोग होणार नाही आणि कोरोना पुन्हा होईल. व्हॅक्सिन कारखान्यात तयार झाल्यापासून तर थेट पेशंटला टोचण्यापर्यंतचा हा प्रवास खूप मोठा आहे व अनेक स्तरातून जाणारा आहे.अनेक व्यक्ती, वाहतूक, साठवणूक शीतयंत्र, टोचणाऱ्या व्यक्ती यांच्याहातातून हे व्हॅक्सिन लोकांपर्यंत पोहचत आहे. या सर्व प्रवासात त्याचे तापमान 2 ते 8 डिग्री राखणं म्हणजेच कोल्डचेन. या सर्व प्रवासात या व्हॅक्सिनची शीत साखळी (कोल्ड चेन) मेन्टेन ठेवणे ही अत्यंत जटील आणि जबाबदारीचे काम आहे.

आज आपण विविध वृत्तपत्रातून व सोशल मिडीयावरून अशा बातम्या ऐकतो की, काही लोकांना कोरोना व्हॅक्सिनेशनचे दोन्ही डोस घेऊनही पुन्हा करोना होत आहे. तर त्या लोकांना ही कोल्डचेन (शीत साखळी ) मेन्टेन झाली नसलेली लस टोचली गेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ही लस साठवण्यासाठी साधा फ्रीज चालत नाही. याचे कारण त्याचे टेम्प्रेचर सतत कमी जास्त होत राहाते. समजा हा साधा फ्रीज फार वेळ बंद असला म्हणजे उदा. जेव्हा रात्रभर बंद असतो तेव्हा तपमान हे 2 डिग्रीच्या खाली जाते बर्फ तयार होते आणि जर फ्रीज उघडला तर आतली थंड हवा जड असल्यामुळे झटकन खाली पायाकडे जाते याचा पायांवर एकदम थंड झोत येण्याचा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे पण त्याच वेळेला लगेच वरची गरम हवा फ्रीजमध्ये घुसते. ही गरम हवा थंड होताने , तपमान एक डिग्री सेल्सियसने कमी होत लॅटन्टहीट 540 कॅलरीज रीलीज होते त्यामुळे सुरुवातीला फ्रीजची आतली हवा गरम होते व ताबडतोब तापमान 8 डिग्रीच्या कितीतरी वर जाते. म्हणजेच व्हॅक्सिन ठेवण्यासाठी ह्या फ्रीज काहीही उपयोग नाही. तसेच ही लस चुकून जरी गोठली गेली तरीही देखील तिची क्षमता नष्ट होते.
यासाठी कोविड लस ठेवण्यासाठी खास ILR (आईस लाईन्ड रेफ्रीजेटरच) लागतो. त्याची रचना म्हणजे त्याच्या कडेला एकमेकांना चिकटून उभ्या बर्फ भरलेल्या नळ्या बसवलेल्या असतात.शिवाय तो आडवा असतो त्यामुळे उघडला तेव्हा त्यातील जड थंड त्यातच राहते व त्याचे तापमान स्थिर 2 ते 8 डिग्रीच असते. कारण आपल्याला लसीचे बर्फ करायचे नाही तर ती बर्फाशेजारी ठेवून तिची कोल्डचेन मेन्टेन ठेवायची आहे. असे ILR फ्रीज सरकारी दवाखान्यात असतीलच पण लस टोचणाऱ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये असे फ्रीज आहेत का याची खातरजमा करून घेणे जरूरीचे आहे. नसतील ती खाजगी लस केंद्रातून लस टोचून घेऊ नये. या ILR फ्रीजपासून तर पेशंटला लस मिळेपर्यंतचा व्हॅक्सिनचा प्रवास व हाताळणी ही अत्यंत महत्त्वाची आहे.

ILR फ्रीजमधून व्हॅक्सिन काढून ती व्हॅक्सिन सेंटरवर पोहचवण्यासाठी ती व्हॅक्सिन कॅरियर या बॉक्समध्ये टाकून लसीकरणाच्या ठिकाणी न्यावी लागते. ह्या व्हॅक्सिन कॅरियरमध्ये व्हॅक्सिन बाटल्या ज्याला मेडीकल भाषेत व्हायल म्हणतात, त्या ठेवताना सरसकट एकदम ओंजळ भरून कांदे बटाटे घेतले आणि व्हॅक्सिन कॅरियर मध्ये टाकले असे करता येणार नाही कारण त्याचा शरीराशी संपर्क येईल व त्याचे तपमान आपल्या शरीराइतके म्हणजेच 37.5 डिग्रीला पोचेल आणि व्हॅक्सिन निरोपयोगी होईल. ही प्रत्येक व्हायल एक एक करून अगोदरच थंड करून ठेवलेल्या चिमट्याने अलगद उचलून व्हॅक्सिन कॅरियरमध्ये ठेवणे गरजेचे आहे.
त्यासाठी हा व्हॅक्सिन कॅरियर एक तास अगोदरच आइस पॅक ठेवून थंड केलेला असावा. नाहीतर घेतला व्हॅक्सिन कॅरियर आणि भरले त्यात व्हॅक्सिन, असे केले तर व्हॅक्सिन रुम टेंपरेचरला म्हणजे 28 -30 डिग्रीच्या संपर्कात येऊन व्हॅक्सिन कॅरियरमध्ये व्हॅक्सिन व्हायलचे तापमान वाढून व्हॅक्सिन निकामी होऊ शकते. तसेच लस भरल्यावर व्हॅक्सिन कॅरियर टाईट बंद केलेला असावा.

आता व्हॅक्सिन सेंटर वर हे व्हॅक्सिन कॅरियर नेतांना सूर्यप्रकाशाच्या संपर्कात न येता सावलीत व जमल्यास ए सी गाडीतूनच न्यावे लागतात. कुठल्याही परिस्थितीत गाडीतून नेताता त्यावर गाडीच्या खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश पडणार नाही याची काळजी घ्यावी लागते. व्हॅक्सिन टोचण्यासाठी एक एक व्हायल बाहेर काढताना पूर्वीच थंड केलेल्या (प्री कूल्ड) चिमट्यानेच पकडून बाहेर काढली गेली पाहिजे, हाताच्या मुठीत पकडून नाही. बाहेर काढेलेले व्हॅक्सिन आइस पॅकमध्येच ठेवले गेले पाहिजे.
बऱ्याच लसीकरणाच्या ठिकाणी ही व्हायल बाहेरच टेबलावर पडलेली असते. व्हॅक्सिन व्हायल (बाटली) दिसते किंवा आइस पॅकमध्ये ठेवलेले तर दिसते पण आईस पॅकमध्ये आइसचे पाणी झाले तर कोल्डचेन मेन्टेन करण्यासाठी नवा आईस पॅक घेतला जात नाही. तसेच आता उन्हाळा सुरु झाला आहे, खिडकितून टेबलावर सूर्यप्रकाश येत आहे. त्या टेबलावर हे व्हॅक्सिन व्हायल ठेवलेले दिसून येतात. असे व्हॅक्सिन टोचून घेऊन त्याचा काहीही उपयोग होणार नाही.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे लस टोचतांना व्हॅक्सिन व्हायल (बाटली) सर्व बोटांनी किंवा मुठीत पकडलेली नाही ना हे पहावे. कारण सरळ सरळ आहे तसं जर झालं तर व्हॅक्सिनचं तापमान शरीराइतके होऊन ते व्हॅक्सिन निकामी होईल. त्यासाठी बाटली अंगठा व अंगठ्याजवळचे बोट यानेच व ते ही या बाटलीच्या तोंडाला जिथं आत रबरी बूच आहे आहे तिथं पकडून तिच्यातून हवं तेवढा डोस काढून झाल्यावर ताबडतोब आइसपॅकमध्ये ती बाटली ठेवली गेली पाहिजे म्हणजे तिचे तापमान मेन्टेन राहील. अशी ही प्रक्रियाअसून, याबाबत सखोल प्रशिक्षण व्हॅक्सिनेशन करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलेले आहे.
पण कामाच्या ताणामुळे प्रत्यक्ष लस देणाऱ्या व्यकतीकडून या सर्व बाबींकडे दुर्लक्ष होते. आणि तसे झाले तर कोट्यवधी रूपये किमतीचे हे औषध वाया जाऊन यामागे असलेले असंख्य लोकांचे प्रचंड श्रमदेखील वाया जातील. असं होऊ नये म्हणून यावर लक्ष ठेवणारी फिरती पथकं तयार करणे गरजेचे आहे. या पथकांनी व्हॅक्सिनेशन सेंटरवर कडक नजर ठेवावी. सरकारी लोक म्हणतात ह्या व्हॅक्सिनची क्षमता 70% च आहे. ते खरंच असेल .पण जरी ह्या लसीची क्षमता 70-80 टक्केच आहे म्हणजे 100 टक्के सरंक्षण ती देऊ शकत नाही पण काटेकोर कोल्ड चेन मेन्टेन केलेली लस टोचली गेली तर जे 70% सरंक्षण मिळेल, त्यामुळे संबंधित रुग्णाचा जीव वाचेल. मृत्यू होणार नाही. 
पण कोल्डचेन मेन्टेन न केलेली लस टोचली गेली तर मात्र या लसीमुळे कोरानापासून सरंक्षण मिळणार तर नाहीच पण रुग्ण लस घेतल्याच्या फसव्या भ्रमात राहील, मानवी प्रवृत्तीने मी आता लस घेतली आहे आता मला कोरोना होणार नाही त्यामुळे मी मास्क वापरणार नाही, काळजी घेणे बंद करेल आणि मग पुन्हा करोना केसेस वेगाने वाढत राहतील. कारण लक्षात ठेवा लस घेतल्यानंतरही लस घेणाऱ्याला करोनापासून संरक्षणाची सर्व काळजी घ्यायची आहे. ही प्रतिबंधक लस असली तरी ती १०० टक्के करोनापासून तुमचे संरक्षण करु शकत नाही.
त्यामुळे कृपया कोविडची लस घेताना वरील काळजी घेतली आहे की नाही याची माहिती करुन घ्यावी, तसेच लस घेतल्यानंतरही करोनापासून संरक्षणाची सर्व काळजी घ्यावी. कारण शेवटी आपल्यासोबत आपल्या कुटुंबियांचा आणि आपल्या देशातील प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे. आपल्या बेजबाबदारीने त्याला धोक्यात टाकू नका.







