अमरावती जिल्ह्यात सापडली स्फोटके, तिघांना अटक

अमरावती (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील तिवसा शहरात 200 जिलेटीनच्या कांड्या व 200 डिटोनेटर सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तिवसा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून स्फोटके बाळगण्याचे नेमके कारण काय याचा तपास ठाणेदार रिता उईके यांनी सुरु केला आहे. 17 तारखेच्या रात्री दोन संशयित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले असून त्याचा उच्चस्तरीय तपास ग्रामीण पोलिसांमार्फत सुरु आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 17 तारखेच्या रात्री तिवसा येथील पंचवटी चौकातून दुचाकी जात होती. दुचाकीवर दोन तरुण पोते घेऊन जात होते. यात अवैध दारु असावी असा पोलिसांना संशय होता म्हणून त्यांनी गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही तरुणांनी गाडी सुसाट वेगाने पळविली. पोलीस पाठलाग करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गाडीवरील जिलेटीन व डिटोनेटर भरलेले पोते शेतात फेकले. पोलिसांनी या गाडीचा तपास केला असता संबंधित गाडी ही सुमित सोनोने नावाच्या तरुणाचे असल्याचे लक्षात आले

याबाबत काल दिवसभर पोलिसांनी सुमीतची चौकशी केली. त्यावेळी त्याने आपणही स्फोटके बेनोडा येथून आणल्याचे सांगितले. लांडगे व इतर दोघा जणांनी ही स्फोटके दिल्याची सुमितने पोलिसांना सांगितले. त्यानुसार बेनोडा येथील लांडगे व इतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान सावरगाव येथील सुमितला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणात पोलिसांनी स्फोटक कायद्याची विविध तीन गुन्हे तसेच कलम 286 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात आरोपीची संख्या मोठी असल्याचा पोलिसांना संशय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here